गावकारभाऱ्यांचे भवितव्य मतपेटीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:15 AM2021-01-16T04:15:45+5:302021-01-16T04:15:45+5:30
पुणे : जिल्ह्यात ६४७ ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी झालेले मतदान किरकोळ प्रकार वगळता शांततेत पार पडले. गावकारभाऱ्यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले ...
पुणे : जिल्ह्यात ६४७ ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी झालेले मतदान किरकोळ प्रकार वगळता शांततेत पार पडले. गावकारभाऱ्यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून त्यांच्या भविष्याचा निर्वाळा सोमवारी होणार आहे. ग्रामस्थांनी उत्साहात मतदानाला प्रतिसाद दिला. मोठ्या प्रमाणात झालेल्या मतदानामुळे उमेदवारांची धाकधुक वाढली आहे. तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी होणार असून प्रशासनातर्फे मतमोजणीची पूर्ण तयारी करण्यात आली आहे. यामुळे गावाच्या नेतृत्वासाठी होणाऱ्या या लढतीत कोण बाजी मारेल, हे सोमवारीच ठरणार आहे.
जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून ग्रामपंचयातींच्या निवडणुकीसा फड रंगला होता. याची सांगता चार तारखेला झाली. जिल्ह्यात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. सकाळपासूनच मतदारांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. सकाळपासून मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. आपल्या गावातील मतदान सुटू नये यासाठी प्रत्येक उमेदवार लक्ष देऊन होते. गुरुवारी आदल्या दिवशीच बाहेर गावातील उमेदवारांना आणण्यासाठी विशेष गाड्या उमेदवारांकडून रवाना झाल्या होत्या. या गाड्या उमेदवारांना आणण्यापासून ते त्यांना घरी साेडण्यापर्यंत मतदारराजाच्या दिमतीला होत्या. तर काहींनी स्वत: गावात येत आपला मतदानाचा हक्क बजावला.
जिल्ह्यात सकाळपासूनच मतदानासाठी उत्साही वातावरण होते. काही किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत झाले. दौंड तालुक्यातील कुसेगाव येथे सकाळी ९ च्या सुमारास दोन गटात बाचाबाची झाल्याने तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी हस्तक्षेप करत तणाव शांत केला. नारायणगाव येथे चक्क उमेदवार मतदारराजाला तेलाच्या कॅनचे वाटप करताना आढळल्याने पोलिसांनी दोन उमेदवारांवर गुन्हा दाखल केला. तर लोणी काळभोर येथे चक्क एका गटाने दुसऱ्या गटाच्या गाडीच्या काचा फोडल्याने तणावाचे वातावरण झाले होते. आंबेगाव तालुक्यातील अवसरी येथे काही जण दुबार मतदान करताना आढळले. यावर काही उमेदवारांनी आक्षेप घेतला. मात्र, पोलिसांनी लगेच हस्तक्षेप करत तणाव निवळला.
चौकट
पोलिसांचा चोख बंदोबस्त
मतदान शांततेत व्हावे यासाठी ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता. प्रत्येक मतदान केंद्रावर उमेदवारांच्या रांगा लागल्याने शारीरिक अंतराचे पालन होत नव्हते. यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करत त्यांना दूर करत एकमेकांपासून अंतर पाळायला लावले. ज्यांच्या चेहऱ्यावर मास्क नव्हते त्यांच्यावर कारवाई करण्यात येत होती.
सॅनिटायझर लावून केले मतदान
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर सर्व आवश्यक यंत्रणा कार्यरत ठेवण्यात आल्या होत्या. आरोग्य यंत्रणा चोख ठेवण्यात आली होती. मतदान केंद्रावर सॅनिटायझर तसेच चेहऱ्यावर मास्क पाहूनच मतदारांना आत सोडले जात होते. प्रत्येकाच्या हातावर सॅनिटायझर लावून मतदारांना मतदान करण्यासाठी आत सोडले जात होते.