गावकारभाऱ्यांचे भविष्य मतपेटीत होणार बंद
By admin | Published: August 4, 2015 03:50 AM2015-08-04T03:50:04+5:302015-08-04T03:50:04+5:30
५४ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक व एका ग्रामपंचायतीच्या एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या (दि. ४) सकाळी साडेसात वाजता मतदान
इंदापूर : ५४ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक व एका ग्रामपंचायतीच्या एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या (दि. ४) सकाळी साडेसात वाजता मतदान सुरू होत आहे. मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
एकूण १९१ प्रभागांतील ५०४ जागांसाठी १ हजार १९९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ६८ हजार ८९४ पुरुष, ६१ हजार ८२५ महिला, असे एकूण १ लाख ३० हजार ७१९ मतदार मतदान करणार आहेत. मतदानासाठी १९१ मतदान केंद्रांसह २३ साह्यकारी मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. या २१४ मतदान केंद्रांसाठी ८ क्षेत्रीय अधिकारी, ५५ निवडणूक निर्णय अधिकारी, २१४ मतदान केंद्राध्यक्ष, मतदान केंद्राधिकारी श्रेणी १, २ व ३चे प्रत्येकी २१४ अधिकारी तसेच २१४ शिपाई नेमण्यात आले आहेत.
कापूरहोळ : कापूरहोळ, धांगवडी, न्हावी ३२२, न्हावी १५, किकवी, केंजळ, भोंगवली, गुणंद, टापरेवाडी आदी गावांतील निवडणुकीसाठी प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली असून, मतदानासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे.
दुपारी भोर तालुक्यातून एसटीने मतदान अधिकारी, शिपाई, पोलीस संबंधित नेमून दिलेल्या गावामध्ये येऊन त्यांनी केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी बूथ उभारला. मॉकपोल घेण्यात आला. मतदानाच्या लेखाजोखाविषयक असणाऱ्या कागदपत्रांची फेरतपासणी काटेकोरपणे करण्यात आली. संबंधित शाळांनी यासाठी सर्व सुविधा पुरवून फर्निचरची व्यवस्था केली. मतदान अधिकाऱ्यांनी मतदान कक्ष उभारून मतदान अधिकारी यांची बैठक व्यवस्था करून खोलीच्या बाहेरील बाजूस सूचनाफलक लावल्याचे दिसून आले. कापूरहोळ या गावच्या निवडणुकीकरिता केंद्राध्यक्ष, ३ मतदान अधिकारी, १ शिपाई, पोलीस- १ असे नेमण्यात आले आहेत, ३ बुथ आहेत, अशी माहिती कापूरहोळ मतदान केंद्राचे केंद्राध्यक्ष शेख एस. एन. यांनी ‘लोकमत’ला दिली.
(वार्ताहर)