यशवंत कारखान्याचे भवितव्य आज ठरणार
By admin | Published: April 21, 2017 06:00 AM2017-04-21T06:00:45+5:302017-04-21T06:00:45+5:30
थेऊर येथील हवेली तालुक्याचे भूषण ठरलेला यशवंत सहकारी साखर कारखाना आहे. कारखाना बंद पडल्यानंतर, सहा वर्षांच्या काळातील सभासदांची ही तिसरी
उरुळी कांचन : थेऊर येथील हवेली तालुक्याचे भूषण ठरलेला यशवंत सहकारी साखर कारखाना आहे. कारखाना बंद पडल्यानंतर, सहा वर्षांच्या काळातील सभासदांची ही तिसरी सर्वसाधारण सभा कारखान्याचे भवितव्य ठरविण्याचा निर्णय घेण्यासाठी उद्या शुक्रवारी (दि. २१)
होणार आहे.
सध्या या कारखान्यावर सुमारे १०० कोटींचे जवळपास कर्ज आहे. केवळ माजी संचालक, माजी पदाधिकारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी वा या भागातील स्वयंघोषित पुढारी यांनीच त्या ठिकाणी बोलायचे व त्यांच्या नेत्यांनी सांगितलेल्या गोष्टी ज्या वैयक्तिक आणि स्वत:च्या राजकीय गटाच्या फायद्याच्या तेवढ्या मांडायच्या व मंजूर करून घ्यायच्या, अशा प्रकारची ही वार्षिक सर्वसाधारण सभा होऊ नये, अशी मागणी या भागातील सभासद शेतकऱ्यांनी केली आहे.
पूर्व हवेली तालुक्यातीलच नव्हे, तर कारखान्याच्या सुमारे २२ हजार शेतकरी सभासद, कामगार सभासद व अन्य कामगारबंधूंच्या हिताचे रक्षण करणारा निर्णय सर्व पातळ्यांवर सांगोपांग चर्चा होऊन होणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच, त्या ठिकाणी सर्व सामान्य शेतकरी सभासदाला त्याचे मत मांडून देण्यास प्राधान्य देऊन शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर होणे गरजेचे आहे, अशी सभासदांची अपेक्षा आहे. मात्र उघडपणे नावानिशी बोलायला कुणी तयार नाही.
येणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत येणारे विषय हे यापूर्वीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी या पूर्वीच मंजूर केले असतानाही, परत त्याच विषयावर सर्वसाधारण सभा घेण्याचा घाट का घातला जातोय याची शंका सभासदांना सतावित आहे, यापूर्वी गरजेपुरत्या जमिनीची विक्री करायची व देणी भागवून कारखाना चालू करायचा, असा प्रस्ताव होता. पण,तो अस्तित्वात येऊ शकला नाही. यानंतर अनेक प्रस्ताव आले व गेले. पण, कारखाना चालू झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आजूबाजूच्या खासगी कारखान्यांचा व गुऱ्हाळाचा आधार घेऊन उसाचे गाळप करून जे मिळेल ते पदरात पडून घेतले आहे.
पाच ते सहा वर्षे झाली हा कारखाना बंद आहे. आता सभासदांची मागणी ही आहे की, कारखाना चालू करण्याच्या भानगडीत न पडता कारखाना भंगारात विकून व कारखान्याच्या मालकीची सर्व जमीन बांधकाम व्यावसायिक व कारखाना सभासद यांच्यातील कराराने विकसित करण्यास देऊन त्या ठिकाणी मगरपट्टा सिटीसारखा प्रकल्प उभारावा. त्यातून येणाऱ्या पैशातून सर्व देणी देऊन शिल्लक राहणारी रक्कम कायम मुदत ठेव म्हणून ठेवून येणारे व्याज सभासदांना लाभांश स्वरूपात देण्यात यावे, अशी भावना सभासदांनी बोलून दाखविली.