परीक्षेअभावी भावी गुरुजी ‘सलाइन’वर

By admin | Published: May 11, 2015 06:41 AM2015-05-11T06:41:22+5:302015-05-11T06:41:22+5:30

राज्यातील बी.एड. कॉलेज संस्थाचालकांच्या संघटनेत फूट पडल्याने या वर्षी बी.एड. प्रवेश परीक्षेची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही.

Futuristic Guruji 'Saline' will be unable to test | परीक्षेअभावी भावी गुरुजी ‘सलाइन’वर

परीक्षेअभावी भावी गुरुजी ‘सलाइन’वर

Next

सदानंद औंधे, मिरज
राज्यातील बी.एड. कॉलेज संस्थाचालकांच्या संघटनेत फूट पडल्याने या वर्षी बी.एड. प्रवेश परीक्षेची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. संस्थाचालकांच्या दोन्ही गटांनी प्रवेश परीक्षेसाठी दावा केल्याने प्रवेश प्रक्रियेस विलंब होण्याची शक्यता आहे.
राज्यात २८९ विनाअनुदानित, तर १३० अनुदानित व शासकीय बी.एड. कॉलेज आहेत. या महाविद्यालयांत प्रवेशासाठी दरवर्षी वेगवेगळी प्रवेश परीक्षा होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे २००४ पासून विनाअनुदानित बी.एड. कॉलेज संस्थाचालकांच्या संघटनेतर्फे दरवर्षी प्रवेश परीक्षा होऊन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. दरवर्षी सुमारे ३० हजार विद्यार्थी बी.एड.ची प्रवेश परीक्षा देतात.
परीक्षा शुल्क म्हणून जमा होणाऱ्या रकमेत गैरव्यवहार होत असल्याचा ठपका ठेवून संघटनेच्या मध्यवर्ती प्रवेश प्रक्रियेचे संचालक देवेंद्र जोशी व सचिव रमजान शेख यांना अध्यक्ष गजेंद्र ऐनापुरे यांनी निलंबित केले.
त्यानंतर देवेंद्र जोशी व रमजान शेख यांनी संघटनेच्या नवीन कार्यकारिणीची स्थापना करून शासनाच्या प्रवेश नियंत्रण समितीकडे प्रवेश परीक्षा घेण्याची परवानगी मागितली आहे. ऐनापुरे यांच्या अध्यक्षतेखाली जुन्या संघटनेने यास विरोध केल्याने बी.एड. प्रवेश परीक्षा घेण्याच्या अधिकाराबाबत वाद निर्माण झाला आहे.
औरंगाबाद येथील धर्मादाय आयुक्तांच्या न्यायालयात वादाचा निकाल लागल्यानंतर प्रवेश परीक्षेसाठी प्रक्रिया सुरू होणार आहे. दरवर्षी फेब्रुवारीत प्रवेश नियंत्रण समितीकडून संघटनेच्या प्रवेश परीक्षेस मान्यता देण्यात येते. मे अखेर प्रवेश परीक्षा पूर्ण होऊन जूनपासून बी.एड. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष सुरू होते. मात्र, गोंधळाच्या वातावरणामुळे यावर्षी बी.एड. प्रवेश परीक्षेबाबत संभ्रम आहे.
---------
महाविद्यालयांकडे विद्यार्थीच नाहीत
राज्यात सुमारे तीन लाख बी.एड.धारक बेरोजगार असताना बी.एड. महाविद्यालयांना विद्यार्थी मिळणे मुश्कील ठरले आहे. गतवर्षी विद्यार्थ्यांअभावी अनेक जागा रिक्त राहिल्या होत्या. बी.एड. दोन वर्षांचे झाल्यास शिक्षकांची संख्या व पगारावरील खर्च वाढणार आहे. एका वर्षाचे अतिरिक्त शुल्क भरावे लागणार असल्याने बी.एड.ला विद्यार्थी मिळणार नाहीत, अशी भीती व्यक्त होत आहे.

बी.एड. अभ्यासक्रम दोन वर्षांचा केल्यास संस्थाचालक संघटना त्याविरोधात आंदोलन करणार आहे. बी.एड.चा अभ्यासक्रम तयार करणारी मंडळी आता अभ्यासक्रम अपुरा असल्याचे सांगत दोन वर्षांचा आग्रह धरत आहेत. त्यांची विद्वत्ता तपासली पाहिजे.
- गजेंद्र ऐनापुरे, अध्यक्ष, बी.एड. संस्थाचालक संघटना

Web Title: Futuristic Guruji 'Saline' will be unable to test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.