G20 Summit : परदेशी पाहुण्यांसाठी पुण्यात शोभेसाठी लाखोंची उधळण; उभारली जाणार कृत्रिम झाडे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 04:30 PM2022-12-20T16:30:08+5:302022-12-20T16:33:56+5:30
एका झाडासाठी द्यावे लागणार १५ ते २० हजार रुपये भाडे
पुणे : शहरात होणाऱ्या जी-२० परिषदेसाठी विमानतळ ते सेनापती बापट रस्ता, शहरातील चौक आणि प्रमुख रस्त्यांवर शोभेची कृत्रिम झाडे उभी करण्यात येणार आहेत. ही झाडे आठ दिवसांसाठी भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. एका झाडावर १८० वॅटचे बल्ब असून, एका झाडासाठी १५ ते २० हजार रुपये भाडे द्यावे लागणार आहे.
जगातील आर्थिकदृष्ट्या प्रगत २० देशांची ‘जी २० परिषद’ २०२३ मध्ये पुण्यात होणार आहे. पुण्यातही जानेवारी आणि जूनमध्ये या परिषदेच्या तीन बैठका होणार आहेत. या बैठकीसाठी विविध १००हून अधिक प्रतिनिधी पुण्यात येणार आहेत. त्यामुळे महापालिकेने शहराचे सौंदर्यीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. पुण्यातील ६० चौक आणि चौकात बेटे यांचे सुशोभीकरण केले जात आहे.
परिषदेच्या बैठकीसाठी येणारे प्रतिनिधी लोहगाव विमानतळ ते सेनापती बापट रस्ता आणि इतर काही भागांतून प्रवास करणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील पथदिवे एकसारखे असावे. ते नादुरुस्त किंवा बंद असू नये, यासाठी पालिकेच्या विद्युत विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. पथदिव्यांच्या खांबांची रंगरंगोटी करण्यात येत आहे, असे पालिकेच्या विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदुल यांनी सांगितले.