G20 परिषदेची जय्यत तयारी सुरू; रस्त्यांच्या कामासाठी १० जानेवारीचे अल्टिमेटम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 10:31 AM2023-01-05T10:31:04+5:302023-01-05T10:31:13+5:30
राज्यातील पालिका आयुक्तांचा १३ जानेवारीला परिसंवाद...
पुणे : शहरात होणाऱ्या जी-२० आंतरराष्ट्रीय परिषदेची तयारी जय्यत सुरू आहे. या पार्श्वभूमीवर लोहगाव विमानतळ ते सेनापती बापट रस्ता आणि इतर रस्त्याची कामे तातडीने होण्यासाठी पालिकेच्या १२ विभागप्रमुखाकडे या रस्त्याची जबाबदारी दिली आहे. १० जानेवारीपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आदेश दिल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.
पुण्यात जानेवारी आणि जूनमध्ये तीन बैठका होणार आहेत. यासाठी विविध ३४ देशांचे १२० ते १३० प्रतिनिधी पुण्यात येणार आहेत. पहिली बैठक १५ ते १७ जानेवारी दरम्यान होणार आहे. परिषदेचे प्रतिनिधी लोहगाव विमानतळ ते सेनापती बापट रस्ता आणि इतर काही भागांतून प्रवास करणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील पथदिवे, भिंतींची रंगरंगोटी, पदपथ, रस्ता दुभाजक आणि चौकांचे सुशोभीकरण करण्याचे काम सुरू आहे. हे काम समन्वयाअभावी अद्याप पूर्ण झाले नाही. त्यामुळे आता पालिकेच्या १२ विभागप्रमुखांकडे या रस्त्याचे काम दिले आहे.
राज्यातील पालिका आयुक्तांचा १३ जानेवारीला परिसंवाद
जी-२० परिषदेच्या शहरातील बैठकीपूर्वी जनजागृती करण्यासाठी महापालिका विविध उपक्रम राबविणार आहे. त्यात सायकल रॅली, परिसंवाद हाेईल. राज्यातील आणि शेजारील राज्यातील पालिका आयुक्तांचा येत्या १३ जानेवारी रोजी परिसंवाद आयोजित केला जाणार आहे. त्यामध्ये यशस्वी स्टोरी सांगितल्या जाणार आहेत.
गरज पडली तरच मेट्राेचे काम बंद!
मेट्राेचे काम ज्या ठिकाणी सुरू आहे. त्या ठिकाणचा राडारोडा उचलण्यात यावा. दुभाजक दुरुस्त करून घ्यावे. त्यावर जी-२०चा लोगा टाकावा, असेही मेट्राेला सांगण्यात आले आहे. जी-२० परिषदेच्या वेळी वाहतूक कोंडी होऊ नये त्यासाठी गरज पडली तरच मेट्राेचे काम बंद ठेवण्यात येणार आहे, असे विक्रम कुमार यांनी सांगितले.