पुण्यात G20 परिषदेत परदेशी पाहुण्यांनी धरला ढोल-लेझीमवर ठेका; पाहा व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 10:06 AM2023-01-17T10:06:47+5:302023-01-17T10:15:43+5:30
सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणाच्या अंतिम टप्प्यावर ढोल-लेझीमच्या तालावर परदेशी पाहुण्यांनी ठेका धरला...
पुणे : 'जी-२०' बैठकीच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे सर्व जी-२० प्रतिनिधींसाठीं सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणाच्या अंतिम टप्प्यावर ढोल-लेझीमच्या तालावर परदेशी पाहुण्यांनी ठेका धरला. ढोल, लेझीम, टाळ हाती घेत महाराष्ट्राच्या संस्कृतीला दाद दिली.
यावेळी भैरी भवानी परफॉर्मिंग आर्ट्सच्या कलाकारांनी 'सागा ऑफ मराठा एम्पायर' या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे विविधांगी दर्शन घडविणाऱ्या कलांचे सादरीकरण केले. प्रारंभी शिववंदना, मर्दानी खेळ, पोतराज, वाघ्या-मुरळी, गोंधळ, छक्कड, संकेतभाषा कला असलेली करपल्लवी यासोबतच तान्हाजी मालुसरे यांना समर्पित सादरीकरण करण्यात आले. शिवराज्याभिषेक गीताने कार्यक्रमात परमोच्च बिंदू गाठला. त्यानंतर अखेरीस ढोल, लेझीम ताशाचे जोरदार सादरीकरण झाले आणि परदेशी पाहुण्यांना यात सामील होण्याचा मोह अवरला नाही. त्यांनीदेखील सर्व कलाकारांना दाद देत ढोल ताशाच्या गजरावर ठेका धरला. तर काहींनी टाळ वाजवून आनंद व्यक्त केला.
पालकमंत्र्यांनी केले प्रतिनिधींचे स्वागत
जी-२० बैठकीसाठी आलेल्या प्रतिनिधींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केले. पालकमंत्र्यांनी काही प्रतिनिधींशी संवाददेखील साधला. पुणे शहराने पाहुण्यांच्या स्वागतासाठी चांगली तयारी केली आहे. पाहुण्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्यावेळी व्यक्त केलेला आनंद लक्षात घेता पुणेकरांचे प्रयत्न सफल झाले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राची सांस्कृतिक लोकधारा सर्वांनाच आपलेसे करणारी असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या आर्थिक घडामोडी या विभागाचे संयुक्त सचिव सॉलोमन अरोकिराज, विभागीय आयुक्त सौरभ राव, कुलगुरू डॉ. कारभारी काळे, पुणे महानरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त रितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते.
#WATCH | Maharashtra: G-20 delegates joined local artists performing Maharashtrian lezim dance at a cultural program in Pune yesterday pic.twitter.com/aZ7jW0e8ha
— ANI (@ANI) January 16, 2023