G20 Summit Pune | जी-२० परिषदेसाठी पुणे विद्यापीठात तयारीला वेग
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 11:29 AM2023-01-04T11:29:09+5:302023-01-04T11:29:25+5:30
पुणे विद्यापीठात जी-२० परिषदेतील काही सभा आणि कार्यक्रम हाेणार आहेत...
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जी-२० परिषदेतील काही सभा आणि कार्यक्रम हाेणार आहेत. विद्यापीठाच्या प्रांगणात १६ जानेवारीला सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून, त्याअनुषंगाने विद्यापीठ प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. दरम्यान, जी-२० परिषद काय आहे, कशासाठी हाेणार आहे? याबाबत माहिती देण्यासाठी विद्यापीठाने विशेष माहितीपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कुलसचिव डाॅ. प्रफुल्ल पवार यांनी दिली.
पवार म्हणाले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वास्तूमध्ये जी-२० परिषदेतील काही कार्यक्रम होणार आहेत. त्यामुळे विद्यापीठाकडून विद्यापीठ परिसरात स्वच्छतेसह इमारतीच्या डागडुजीची कामे करण्यात येत आहेत. तसेच सुरक्षेच्या अनुषंगाने तयारी केली जात आहे. जी-२० परिषद सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना परिषदेबाबत माहिती व्हावी, यासाठी विद्यापीठाच्यावतीने १३ व १४ जानेवारी रोजी विशेष व्याख्यानाचे आयोजन केले आहे. हे व्याख्यान विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने ऐकता येणार आहे. विद्यार्थ्यांसोबत सामान्य नागरिकांनादेखील या व्याख्यानाच्या माध्यमातून माहिती दिली जाईल. याबाबत लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर माहिती माहिती दिली जाईल, असे पवार यांनी सांगितले.
प्र. कुलगुरू डाॅ. संजीव साेनवणे म्हणाले, जी-२० परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जागतिक घडामोडी जाणून घेण्याची ही संधी निर्माण झाली आहे.
जी २० परिषदेअंतर्गत विद्यापीठात साेमवारी दि. १६ राेजी सांस्कृतिक कार्यक्रम तसेच स्नेहभोजनाचा कार्यक्रम होणार आहे. विद्यापीठाच्या दीडशे वर्षे जुन्या ऐतिहासिक वास्तूत हा जागतिक दर्जाचा कार्यक्रम होत असून, ही विद्यापीठासाठी अभिमानाची बाब आहे.
- डॉ. कारभारी काळे, कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.