TET Paper Leak: जी. ए सॉफ्टवेअरचा संस्थापक गणेशन याचाही सहभाग असल्याचे तपासात उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2022 08:59 PM2022-01-02T20:59:49+5:302022-01-02T20:59:55+5:30
आरोग्य, म्हाडा आणि टीईटी परीक्षेच्या पेपर गैरव्यवहारा जी. ए. सॉफ्टवेअरचे डॉ. प्रीशीत देशमुख, अश्विनकुमार यांना अटक करण्यात आली असून या पेपरफुटीमध्ये आता जी. ए. सॉफ्टवेअरचा संस्थापक गणेशन याचाही सहभाग असल्याचे तपासात उघड झाले आहे
पुणे : आरोग्य, म्हाडा आणि टीईटी परीक्षेच्या पेपर गैरव्यवहारा जी. ए. सॉफ्टवेअरचे डॉ. प्रीशीत देशमुख, अश्विनकुमार यांना अटक करण्यात आली असून या पेपरफुटीमध्ये आता जी. ए. सॉफ्टवेअरचा संस्थापक गणेशन याचाही सहभाग असल्याचे तपासात उघड झाले आहे. सायबर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी हजर राहण्याबाबत नोटीस बजावली आहे. मात्र, तो अजून हजर झालेला नाही.
अश्विनकुमार शिवकुमार, सौरभ महेश त्रिपाठी आणि निखिल वसंत कदम (वय ३६, रा. काळेवाडी, पिंपरी, मुळगाव तरडोली, मु. मोरगाव, ता. बारामती) या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांनी आज न्यायालयात आणण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी सांगितले की, या गुन्ह्यात जी ए सॉफ्टवेअर कंपनीचे बंगलुरुचे व्यवस्थापक गणेशन यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सुखदेव ढेरे यांच्या घरझडतीमध्ये २ लाख ९० हजार ३८० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. निखिल कदम यांच्याकडील मोबाईलमधून अश्विनकुमार याला पाठविलेले ई मेल प्राप्त झाले आहेत. त्याने अश्विनकुमार याला ५६ परीक्षार्थींची यादी दिली होती. त्यांच्याकडून प्रत्येकी ४० हजार रुपये दिल्याचे या ई मेलमध्ये नमूद करण्यात आले आहे. जी ए सॉफ्टवेअर कंपनीतील कर्मचारी शेखर मस्तुद याच्या मदतीने अश्विनकुमार याने ७०० परीक्षार्थीचे माक्र्स बदलून ती माहिती टी ई टी २०१८ या परीक्षेच्या मेन सर्व्हरवर अपलोड करुन घेतली आहे. या ७०० परीक्षार्थींची रोल नंबरव मार्क्स असलेली यादी पेनड्राईव्हमध्ये अश्विनकुमार याला दिली होती. हा पेनड्राईव्ह जप्त करायचा आहे.
न्यायालयाने अश्विनकुमार व सौरभ त्रिपाठी यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली असून निखिल कदम याला ४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
* सल्लागार अभिषेक सावरीकर, डॉ. प्रीतीश देशमुख आणि सौरभ त्रिपाठी यांच्यात टीईटी परीक्षेमध्ये अपात्र परीक्षार्थींना पात्र करण्याबाबत डिसेंबर २०१७ मध्ये दिल्लीत बैठक
* राज्य परीक्ष परीषदेने टी ई टी २०१८ परीक्षेतील ८१ बनावट प्रमाणपत्रे दिली आहेत. ती कोणी तयार केली, याचा तपास सुरु
* तुकाराम सुपे याच्या कार्यालयातील संगणकावरच टीईटी २०२० मधील ८०० अपात्र परीक्षार्थींकडून एजंटांमार्फत पैसे घेत मार्क वाढविले.