जेजुरीच्या खंडोबा मंदिराचा गाभारा दीड महिना दर्शनासाठी बंद, कासवापासून दर्शन घ्यावे लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 02:30 PM2023-08-28T14:30:55+5:302023-08-28T14:31:38+5:30

गडावर आलेल्या भाविकांना कासवापासून देवाचे दर्शन घ्यावे लागणार असून, दोन्ही गाभाऱ्यांत जाता येणार नाही

Gabhara of Khandoba temple of Jejuri is closed for darshan for one and a half month, one has to take darshan of God from turtle | जेजुरीच्या खंडोबा मंदिराचा गाभारा दीड महिना दर्शनासाठी बंद, कासवापासून दर्शन घ्यावे लागणार

जेजुरीच्या खंडोबा मंदिराचा गाभारा दीड महिना दर्शनासाठी बंद, कासवापासून दर्शन घ्यावे लागणार

googlenewsNext

जेजुरी : साऱ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडामधील मुख्य मंदिराचा गाभारा व घोड्याचा गाभारा सोमवारपासून दुरुस्तीच्या कामासाठी दीड महिना बंद राहणार आहे. या काळात गडावर आलेल्या भाविकांना कासवापासून देवाचे दर्शन घ्यावे लागणार असून, दोन्ही गाभाऱ्यांत जाता येणार नाही. २६ ऑगस्ट ते ५ ऑक्टोबरपर्यंत गाभारा दुरुस्तीचे काम चालणार असल्याची माहिती खंडोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त पोपटराव खोमणे यांनी दिली.

खंडोबा गडावर महाराष्ट्र शासनातर्फे विकास आराखड्याची कामे सुरू असून, ऐतिहासिक खंडोबा गडाचे जतन करण्यासाठी आवश्यक त्या दुरुस्त्या व उपाययोजना केल्या जात आहेत. यासाठी सुमारे १०७ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर झाला आहे. खंडोबा देवस्थानच्या कार्यालयात मंदिरातील विकासकामांच्या नियोजनासंदर्भात पुजारी, सेवक, ग्रामस्थ, खांदेकरी, मानकरी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य विश्वस्त पोपटराव खोमणे, ॲड. पांडुरंग थोरवे, डॉ. राजेंद्र खेडेकर, अनिल सौंदाडे, मंगेश घोणे, ॲड. विश्वास पानसे, अभिजित देवकाते, व्यवस्थापक राजेंद्र जगताप, प्रमोद चव्हाण आदी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये पुजारी-सेवक व ग्रामस्थांनी अनेक सूचना केल्या. यामध्ये प्रामुख्याने मुख्य गाभाऱ्याचे काम सुरू असताना गडावर येणाऱ्या भाविकांच्या अभिषेक महापूजा या पंचलिंग भुलेश्वर मंदिरात करण्यात याव्यात, आतील गाभाऱ्याचे काम पूर्ण झाल्यावर पंचलिंग मंदिराची दुरुस्ती करण्यात यावी, तेथील काम हाती घेतल्यावर भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मुख्य मंदिरात पूजा करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली. खंडोबा गडाच्या गाभाऱ्याचे दुरुस्तीचे काम हाती घेतले असले तरी भाविकांना गडावर येऊन आपले कुलधर्म कुलाचार करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. खंडोबाची त्रिकाळ पूजा नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. मात्र, इतर कोणालाही गाभाऱ्यामध्ये दर्शनासाठी जाता येणार नाही, असे विश्वस्त मंडळाने स्पष्ट केले. पुजारी सेवक व भाविकांची सोय बघूनच विकासकामे केली जात आहेत, गडावरील पुजारी, खांदेकरी, मानकरी, गावकरी या सर्वांनी खंडोबा मंदिराचे संवर्धन करण्यासाठी करण्यात येत असलेल्या विकासकामांना सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी विश्वस्त मंडळाने केले.

Web Title: Gabhara of Khandoba temple of Jejuri is closed for darshan for one and a half month, one has to take darshan of God from turtle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.