पुण्यातील ख्रिश्चन समाजाचा मोबाईल फ्री गुड फ्रायडे.
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 01:04 PM2021-04-01T13:04:45+5:302021-04-01T13:13:13+5:30
नेहमीच्या उपवासा बरोबरच गॅजेट्स ही उपास करण्याचा बिशप थॉमस डाबरे यांचा संकल्प.
गुड फ्रायडे निमित्त करण्यात येणाऱ्या उपवासामध्ये यावेळेस पुण्यातले ख्रिश्चन बांधव एक वेगळा उपवास करणार आहेत. हा उपवास आहे 'गॅजेट्स' चा. पुणे धर्मप्रांताचे बिशप डॉ. थॉमस डाबरे यांच्या संकल्पनेतून हा उपवास केला जात आहे.
ख्रिश्चन समाजामध्ये चाळीस दिवस उपवास केले जातात. येशू ख्रिस्त हे अरण्यात प्रार्थनेला चाळीस दिवस गेले होते. येशू ख्रिस्ताला क्रुसावर देण्यात आले तो दिवस शुक्रवार होता. म्हणजेच गुड फ्रायडे च्या दिवसापर्यंत हे उपवास सुरू असतात आणि यानंतर ईस्टर संडे साजरा केला जातो.
दरवर्षी केल्या जाणार्या उपवासामध्ये यंदा मोबाईलचा उपवासही करण्याचा निर्णय पुण्यातल्या चर्चने घेतला आहे. यामध्ये सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मोबाईल किंवा गॅजेट्स वापर करायचा नाही असा हा उपवास असणार आहे. सध्या मोबाईल फक्त गरज न राहता अनेकांना व्यसन लागले आहे. त्याच पार्श्वभूमीवर हा उपवासाचा निर्णय घेण्यात आला आहे.
या विषयी बिशप थॉमस डाबरे म्हणाले," सध्या नागरिकांना मोठ्या प्रमाणावर मोबाईलचे व्यसन लागले आहे. चर्चमध्ये देखील नागरिक मोबाईल हाताळताना दिसतात किंवा प्रार्थना सभांमध्ये देखील त्यांच्या हातात मोबाईल असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळेच नेहमीच्या उपवासा बरोबरच मोबाईलचा उपवास करण्याचा देखील निर्णय मी घेतला. त्याला अनेकांकडून चांगला प्रतिसादही मिळत आहे."