गदिमा स्मारकाला मुहूर्त कधी?; पुणे महापालिकेची केवळ आश्वासनेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 03:33 PM2017-11-21T15:33:26+5:302017-11-21T15:40:53+5:30
राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे गदिमांचे स्मारकाचे काम अद्याप रखडलेले आहे. पुणे महानगरपालिका केवळ आश्वासनांच्या पलीकडे काहीच करत नसल्याने रसिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
पुणे : आपल्या अलौकिक कर्तृत्वाने मराठी साहित्य व चित्रपटसृष्टीत गजानन दिगंबर माडगूळकर अर्थात गदिमांनी मोलाचे योगदान दिले. पुढील वर्षी म्हणजेच १ आॅक्टोबर २०१८ रोजी गदिमांचे जन्मशताब्दी वर्ष सुरु होत आहे. मात्र, राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे गदिमांचे स्मारकाचे काम अद्याप रखडलेले आहे. पुणे महानगरपालिका केवळ आश्वासनांच्या पलीकडे काहीच करत नसल्याने रसिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्मारकाला मुहूर्त मिळणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पुणे महानगरपालिकेने १२ वर्षांपूर्वी पुणे-मुंबई रस्त्यालगत वाकडेवाडीजवळ मुळा नदीकाठची माधवराव शिंदे उद्यानालगतची जमीन स्मारकासाठी निश्चित केली होती. स्मारकासाठी महानगरपालिकेने ३ कोटी रुपयांना निधी निश्चित केला होता. पुरापासून रक्षण म्हणून सीमाभिंत बांधण्यापलीकडे स्मारकाची एकही वीट एवढ्या वर्षात उभी राहिली नाही. जागा अडचणीत सापडली आणि निधीही खर्च झाला. त्यामुळे स्मारक रखडल्याची खंत गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
२००७ सालच्या महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाहीरनाम्यात ‘गदिमांचे पुणे येथे स्मारक करु’ असे नमूद केले होते. सत्ता स्थापनेनंतर मात्र गदिमांच्या स्मारकाचा विसर पडला. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी गदिमांचे स्मारक करु, असे आश्वासन दिले होते. महाराष्ट्र सरकारतर्फे गदिमा स्मारक समिती नेमण्यात आली. माडगूळकर कुटुंबीयांना विश्वासात न घेता राजकीय दबावापोटी शेटफळे येथे स्मारक करण्यात आले. केवळ काम उरकण्याच्या उद्देशाने काही बांधकाम उरकण्यात आले. स्मारकाचे काम पूर्ण व्हावे, यासाठी मुख्यमंत्र्यांनाही पत्र पाठवण्यात आले.
२०१७ मध्ये पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाला प्रथमच सत्तास्थापनेची संधी मिळाली. आपल्या कार्यकाळात भाजपा गदिमांच्या स्मारकाचा प्रश्न तातडीने मार्गी लावणार का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. गीतरामायणासारखे महाकाव्य रचणा-या आधुनिक वाल्मिकींचे स्मारक करणे महानगरपालिकेला जमत नसेल तर महाराष्ट्र सरकारने ते ताब्यात घ्यावे, अशी विनंती माडगूळकर कुटुंबीयांतर्फे करण्यात आली आहे. याबाबतचे लेखी निवेदन महापौर मुक्ता टिळक यांना लवकरच देण्यात येणार आहे.
१ आॅक्टोबर २०१८ पासून गदिमांचे जन्मशताब्दी वर्ष सुरु होत आहे. जन्मशताब्दी वर्षानिमित्त पुणे महानगरपालिका अथवा महाराष्ट्र सरकारने गदिमा स्मारकाबाबत तातडीने निर्णय घेऊन काम पूर्ण करावे, अशी आमची मागणी आहे.
- आनंद माडगूळकर