कोथरूडमध्ये महापालिका उभारणार गदिमा स्मारक : महापौर मुक्ता टिळक यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 02:12 PM2018-10-01T14:12:20+5:302018-10-01T14:15:50+5:30
गदिमांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यात पालिका कोठेही कमी पडणार नाही, अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली.
पुणे : गदिमा स्मारकासाठी माडगूळकर कुटुंबियांसह विविध जागांची पाहणी केल्यावर कोथरुडमधील जागा निश्चित करण्यात आली आहे. याचवर्षी स्मारकाच्या कामाला सुरुवात होईल. गदिमांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यात पालिका कोठेही कमी पडणार नाही, अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली. प्रतिभावन्त साहित्यिक ग.दि. माडगूळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या प्रारंभी संवाद, पुणे आणि संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने 'गदिमायन' हा गीत संगीताचा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये आयोजित करण्यात आला होता.यावेळी माडगूळकर कुटुंबियांना कृतज्ञता पत्र बापट यांच्या हस्ते देण्यात आले
पुढे त्या म्हणाल्या की, पुणे हे संस्कृतीचे माहेरघर आहे. गदिमांनी पुण्याला खूप काही दिले. गदिमांचे स्मारक गेल्या 40 वर्षांपासून रखडले होते. केवळ जागा निश्चित झाली,मात्र एक वीटही उभी राहिली नाही. मात्र, जन्मशताब्दीनिमित्त गदिमा स्मारकाचे रखडलेले काम महानगरपालिकेतर्फे मार्गी लावण्यात येणार आहे.स्मारकाचा आराखडाही तयार झाल्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, 'महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाली की कामाला जलद गतीने सुरुवात होईल. जिल्हा नियोजन समितीमार्फत नाविन्यपूर्ण योजनेअंर्तगत स्मारकासाठी शासनाकडून 25 लाख रुपयांचा निधी दिला जाणार आहे..