‘गदिमां’चे साहित्य पॉडकास्टच्या माध्यमातून ऑडिओ स्वरूपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:11 AM2021-05-20T04:11:53+5:302021-05-20T04:11:53+5:30
पुणे : ‘गदिमां’च्या दर्जेदार साहित्याचा मनसोक्त आस्वाद रसिक श्रोत्यांना घेता यावा, या उद्देशाने प्रसिद्ध लेखक आनंद माडगूळकर यांनी एक ...
पुणे : ‘गदिमां’च्या दर्जेदार साहित्याचा मनसोक्त आस्वाद रसिक श्रोत्यांना घेता यावा, या उद्देशाने प्रसिद्ध लेखक आनंद माडगूळकर यांनी एक विशेष पॉडकास्ट सुरू केला आहे.
‘गदिमा’ तथा ग. दि. माडगूळकरांच्या अलौकिक प्रतिभेने कथा, लघुकथा, कविता, पटकथा, कादंबरी, नृत्यनाट्य, सांगीतिका अशा साहित्याच्या विविध प्रांतात लिलया सहज संचार केला. आजची नवीन पिढी संवेदनशील आहे, परंतु धकाधकीच्या जीवनात वाचनासाठी पुरेसा वेळ दिला जात नाही. या पॉडकास्टच्या माध्यमातून ‘गदिमां’चे साहित्य तरुण पिढी तसेच मध्यमवयीन लोकांपर्यंत पोहचविता येईल. ‘गदिमां’च्या कथा या मानवी जीवनाच्या विविध रंग दाखविणार्या असून, त्या सर्वांना भावणार्या अशा आहेत. पॉडकास्टच्या माध्यमातून या कथा ऐकणे हा एक सुखकर अनुभव असेल असे आनंद माडगूळकर यांनी सांगितले.
या पॉडकास्टमध्ये स्वत: आनंद माडगूळकर यांनी अभिवाचन केले असून, योग्य त्याठिकाणी पार्श्वसंगीताचा देखील आधार घेतला आहे. याचबरोबर आनंद माडगूळकरांचे साहित्य देखील या पॉडकास्टद्वारे श्रोत्यांपर्यंत पोहचणार आहे. सुरुवातीला दर १०-१५ दिवसांनी एक नवीन पॉडकास्ट मालिकेतील भाग प्रसारित केला जाईल. हा पॉडकास्ट अक्षय्यतृतीयेला सुरू करण्यात आला असून, सर्वांसाठी विनामूल्य आहे. पुढे जाऊन अनेक प्रसिद्ध कलाकारांनादेखील या उपक्रमात अभिवाचनासाठी सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.