गदिमांचे स्मारक झालेच पाहिजे....एकमुखी जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:28 AM2020-12-15T04:28:34+5:302020-12-15T04:28:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ‘घन घन माला नभी दाटल्या, कोसळती धारा’.. .महाकवी गजानन दिगंबर माडगूळकर यांच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘घन घन माला नभी दाटल्या, कोसळती धारा’.. .महाकवी गजानन दिगंबर माडगूळकर यांच्या काव्यपंक्तीतील हे शब्द उच्चारताच पावसाच्या सरी कोसळू लागल्या अन गदिमांना आदरांजली वाहणारे सारे कवी, कलाकार, शाहीर, साहित्यिक मंडळी त्या आनंदात चिंब भिजले. फुलांनी गदिमांचा रेखाटलेला चेहरा..आकर्षक रंगावली.. गरूड गणपतीच्या प्रांगणात एकत्र आलेले कलावंत...‘गजानन’ माडगूळकरांचा उल्लेख करून जुळून आलेल्या योगायोगाबददल उपस्थितांकडून उमटलेल्या प्रतिक्रिया... अशा उत्साही वातावरणात गदिमांच्या ४३ व्या स्मृतिदिनानमित्त सोमवारी (दि. १४) काव्य जागर पार पडला. यावेळी ‘गदिमांचे स्मारक झालेच पाहिजे,’ अशी एकमुखी मागणी सर्वांनी केली.
कलावंत रसिकांतर्फे गदिमा स्मारकासाठी छेडलेल्या आंदोलनवजा काव्य वाचनामध्ये गदिमांचे पुत्र आनंद माडगूळकर, माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले, शाहीर दादा पासलकर, प्रसिद्ध गायक रघुनंदन पणशीकर, ज्येष्ठ गायक प्रमोद रानडे, ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक, ‘मसाप’चे कार्यवाह बंडा जोशी, निवेदक आनंद देशमुख, शशिकांत सांबा यांचा समावेश होता.
त्याला इतर भाषिकांचीही जोड मिळाली. आंतरराष्ट्रीय वक्ते अनीस चिश्ती (उर्दू), स्वाती दाढे (बंगाली), हेमंत पुणेकर (गुजराती), डॉ. मंगेश कश्यप (इंग्रजी) यांनी गदिमांच्या भाषांतरित कवितांच्या सादरीकरण केले. संयोजन समिती प्रमुख प्रदीप निफाडकर, कवी मनोहर सोनावणे, प्राचार्य डॉ. अविनाश सांगोलेकर, कवी धनंजय तडवळकर, सुप्रस्द्धि गायक अन्वर कुरेशी, बाल कवयित्री वल्लरी देशमुख, उर्मिला कराड अशा कलावंत रसिकांनी या कार्यक्रमाची उंची वाढवली.
चौकट
...हे पेल्यातील वादळ संपावे
“गेल्या काही दिवसात स्मारकावरून जी काही वादावादी झाली ते पेल्यातील वादळ संपावे. गदिमांचे स्मारक करायचे ठरले आहे तर मग सर्वांनी एकत्र येऊन मदत करूयात,” असे आवाहन आनंद माडगूळकर यांनी केले. या काव्यजागर कार्यक्रमात माडगूळकर कुटुंबीय सहभागी होणार नसल्याचे सांगितले गेले होते. मात्र महापौरांनी घोषणा करण्यापूर्वीच मी संयोजकांना उपस्थित राहण्याचा शब्द दिला होता. तो मी पाळला असे, त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.