चांदणी चौकाच्या कामाची गडकरींकडून चौकशी : मेधा कुलकर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 09:32 PM2018-06-01T21:32:02+5:302018-06-01T21:32:02+5:30
चांदणी चौकातील नियोजित उड्डाणपुलाचे काम अखेर सुरु करण्याचे आदेश नितीन गडकरी यांनी शुक्रवारी पुणे दौऱ्यात दिले.
राज्य सरकारही मदत करणार
पुणे: भूसंपादनाअभावी रखडलेले चांदणी चौकातील नियोजित उड्डाणपुलाचे काम अखेर सुरू करण्याचे आदेश केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी त्यांच्या पुणे दौऱ्यात दिले. महापालिकेकडून भूसंपादनाचे काम निधी अभावी थांबले असून त्यात अडचण असेल तर ती दूर करण्याची सकारात्मकता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधीच दाखवली आहे.
आमदार मेधा कुलकर्णी यांनी ही माहिती दिली. त्यांच्याकडून सातत्याने या कामाचा पाठपुरावा सुरू आहे. केंद्र सरकारने या नियोजित उड्डाणपुलाच्या कामासाठी निधी मंजूर केला आहे. गडकरी यांच्या पुणे दौऱ्यात आमदार कुलकर्णी यांच्याकडे त्यांनी याबाबत विचारणा केली, त्यावेळी त्यांनी एकूण १४ हेक्टर जागेचे भूसंपादन करायचे असून त्यातील फक्त ५ हेक्टर जागा महापालिकेने ताब्यात घेतली असल्याचे सांगितले. उर्वरित जागेसाठी महापालिकेकडून प्रभावी प्रयत्न होत नाहीत अशी तक्रार आहे.
कुलकर्णी म्हणाल्या, महापालिकेकडे जागा मालकांना रोख रकमेत नुकसान भरपाई देण्यासाठी पुरेसा निधी नाही. त्याची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी निधी देण्याची तयारी दर्शवली आहे. महापालिका आयुक्त सौरव राव त्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे आता हे रखडलेले काम मार्गी लागेल अशी अपेक्षा आमदार कुलकर्णी यांनी व्यक्त केली.