गडकरी पुतळाप्रकरणी चौघांना जामीन
By admin | Published: January 11, 2017 03:56 AM2017-01-11T03:56:15+5:302017-01-11T03:56:15+5:30
नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा उखडल्याप्रकरणी चारही आरोपींची १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता केली.
पुणे : नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा उखडल्याप्रकरणी चारही आरोपींची १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता केली. आरोपींनी दर रविवारी डेक्कन पोलीस ठाण्यात हजेरी द्यावयाची आहे, अशी अट न्यायालयाने जामीन मंजूर करताना घातली.
पुणे येथील संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा उखडून टाकल्याप्रकरणी चार आरोपींना डेक्कन पोलिसांनी अटक केली होती. चारही आरोपींना पुण्याच्या न्यायालयात ४ जानेवारी २०१७ रोजी हजर केले होते़ त्यांना मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली होती़ त्यांना न्यायालयात हजर केले असता जामीन मंजूर करण्यात आला़
गुन्हा न्यायप्रविष्ट असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात याचे बोलविते धनी कोण आहेत, त्यांची पाळेमुळे खोदून काढली जातील, असे जाहीर वक्तव्य केले होते़ अशा वक्तव्यामुळे पोलिसांवरील दबाव वाढलेला आहे़ अशा वक्तव्यांची व पोलीस तपासाची न्यायिक नोंद घेणे आवश्यक असल्याचा अर्ज आरोपींच्या वतीने अॅड़ मिलिंद पवार, अॅड़ रविराज पवार, अॅड़ भालचंद्र पवार यांनी दाखल केला़ तो न्यायालयाने दाखल करून घेतला आहे़ त्यावर पुढील सुनावणी २३ जानेवारीला होणार आहे़