गड्या, चल आपला गाव बरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:11 AM2021-04-07T04:11:55+5:302021-04-07T04:11:55+5:30
पुणे रेल्वे स्टेशनवर प्रचंड गर्दी, कोरोना वाढण्याचा धोका पुणे : शहरात पुन्हा लॉकडाऊन लागले असल्याने परराज्यातील कामगार पुन्हा आपल्या ...
पुणे रेल्वे स्टेशनवर प्रचंड गर्दी, कोरोना वाढण्याचा धोका
पुणे : शहरात पुन्हा लॉकडाऊन लागले असल्याने परराज्यातील कामगार पुन्हा आपल्या गावी जात असून, पुणे रेल्वे स्टेशनवर मंगळवारी प्रचंड गर्दी झाली होती. हाताला काम नसल्याने आता जगायचं कसं आणि काय खायचं म्हणून हताश होऊन हे कामगार आपल्या गावी निघाले आहेत. ‘भैय्या, सब बंद कर दिया, तो करेंगे क्या और खायेंगे क्या ? इसलिए अपने घर जा रहे, उधर कुछ करेंगे!’ अशा भावना हे कामगार व्यक्त करत होते.
राज्यात सर्वाधिक कोरोनाचा प्रसार पुण्यात होत असल्याने येथे कडक निर्बंध घातले. तसेच लॉकडाऊनही झाले आहे. त्यामुळे हातावर काम करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेकजण आपल्या गावी परत जात आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी होत असून, त्याने कोरोनाचा प्रसार अधिक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही कामगार हॉटेलमध्ये काम करतात. आता हॉटेलच बंद केल्याने त्यांच्या हाताला काम नाही. तसेच पीएमपी देखील बंद असल्याने शहरात ये-जा करण्यासाठी साधन नाही. परिणामी गावी जाण्यावाचून त्यांच्याकडे काहीच पर्याय नसल्याने ते परतीच्या वाटेवर निघाले आहेत.
———
सर्व बंद तर खायचे काय ?
भवानी पेठेत एका कपड्याच्या दुकानात काम करणारा प्रकाश म्हणाला,‘‘ आमचे दुकानच बंद झाले आहे. त्यामुळे आता काय करायचे ? दररोज काम केले तरच पोटाला खायला मिळते. पण सर्व बंद झाल्याने घरी जाण्यावाचून दुसरं काही सूचलं नाही.’’
——————-
कामगार झाले हताश
व्यापाऱ्यांकडे हमालीचे काम करणारा नवनाथ चिंचवडमध्ये राहतो. तिथेही लॉकडाऊनचा फटका बसल्याने आता त्यालाही हाताला काम नाही. रोज हमाली केली तरच त्याला घरी चूल पेटत होती. कात्रज येथील एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करणारा राजन म्हणाला, आता काही काम न करता इथं घरात बसावं लागणार आहे. त्यापेक्षा गावी जाऊन तिथं काही तरी करता येईल.’’ राजन बिहारला आपल्या गावी जात आहे. कोरेगाव पार्कमध्ये इलेक्ट्रिशियनचे काम करणारा छोटू देखील मध्य प्रदेशला जात आहे.
—————————