गहुंजे - साळुंब्रे साकव पूल गेला पाण्याखाली; शेतकरी व कामगारांची गैरसोय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 11:49 AM2022-07-15T11:49:37+5:302022-07-15T11:51:16+5:30
नागरिकांना घालावा लागतोय १० किमीचा वळसा...
गहूंजे (पुणे): पवन मावळात होत असलेल्या दमदार पावसाने पवना नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठया प्रमाणात वाढ झाल्याने मावळातील गहुंजे-साळुंब्रे गावांना जोडणारा साकव पुल पूर्णपणे पाण्यात गेला आहे. पुलावरून वाहत असलेल्या जोरदार पाण्यामुळे पुलावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिणामी पंचक्रोशीतील शेतकरी, दुधव्यावसायिक व कामगार वर्गाची मोठी गैरसोय झाली आहे. शेतकरी व कामगारांना ९ -१० किलोमीटरचा वळसा घालून दुसऱ्या मार्गाने ये-जा करावी लागत आहे.
गहुंजे - साळुंब्रे साकव पूल पाण्याखाली गेल्याने साळुंब्रे गावातून देहूरोड, पिंपरी -चिंचवड परिसरात शाळा महाविद्यालयात येणारे विद्यार्थी तसेच पिंपरी, भोसरी व चाकण औद्योगिक क्षेत्रात जाणारे कामगार, देहूरोड, पिंपरी, चिंचवड व आकुर्डी भाजी मंडई येथे तरकारी, फुले घेऊन येणारे शेतकरी, रावेत व विकासनगर येथे दुध घेऊन येणारे दुध व्यावसायिक व ग्रामस्थांची मोठी गैरसोय होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वांना सुमारे नऊ -दहा किलोमीटरचा वळसा घालून ये - जा करावी लागणार आहे.
उंच पूलाअभावी दरवर्षी होतेय गैरसोय :
दरवर्षी पावसाळ्यात पूल पाण्याखाली जात असल्याने स्थानिकांसह पंचक्रोशीतील शेतकरी, कामगार यांची मोठी गैरसोय होत असते. मात्र शासन उदासीन असल्याची तक्रार करण्यात येत आहे. पावसाळ्याचे तीन-चार महिने मोठ्या जिकीरीचे असून शेतीमाल व दुध व्यवसायात मोठे नुकसान होत असते. उंच व मोठा पु;ल बांधून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची शेतकरी व कामगार वर्गातून होत आहे.