कचरा प्रकल्पांच्या उभारणीसाठी देणार गायरान जमिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:08 AM2021-06-26T04:08:34+5:302021-06-26T04:08:34+5:30

आंबेठाण : अनेक गावांमध्ये कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे यावर उपाययोजना म्हणून कचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणे आवश्यक आहे. ...

Gairan lands to be set up for waste projects | कचरा प्रकल्पांच्या उभारणीसाठी देणार गायरान जमिनी

कचरा प्रकल्पांच्या उभारणीसाठी देणार गायरान जमिनी

Next

आंबेठाण : अनेक गावांमध्ये कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे यावर उपाययोजना म्हणून कचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या गावातील गायरान जागेची मागणी प्रस्ताव तत्काळ जिल्हा परिषदेला पाठवावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद टोणपे यांनी केले.

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत १५ ऑगस्टपर्यंत संपूर्ण जिल्हा कचरामुक्त करण्याची मोहीम जिल्हा परिषदेने हाती घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर खेडच्या पिंपरी-पाईट गटातील गावांचा स्वच्छतेबाबतचा आढावा घेण्यासाठी वराळे येथे गटातील सरपंच व ग्रामसेवक यांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, जि.प.चे कक्ष अधिकारी विक्रम शिंदे, पंचायत विस्तार अधिकारी एस.डी.थोरात, अशोक तट, जगदीश घाडगे, सुजाता रहाणे आदीसह सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते.

टोणपे म्हणाले, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला खर्चाची मर्यादा नसून मुद्रांक शुल्क,१५ वा वित्त आयोग,ग्रामपंचायत निधी किंवा इतर फंडातील पैसे खर्च करू शकता. गावाच्या रस्त्यावर कचरा दिसता कामा नये. यासाठी रस्त्याच्या कडेच्या ग्रामपंचायतींनी दक्षता घेऊन उपाययोजना करावी.

ज्या गावांना गायरान जागा नाही त्यांनी गावठाणच्या मोकळ्या जागेचा प्रस्ताव करा. गावठाण जागेचे अधिकार जिल्हा परिषदेचे सीईओ यांना असल्याने लगेच जागा देण्यात येईल. येत्या १५ ऑगस्टला कचरामुक्त जिल्हा म्हणून घोषित होणार असल्याने ग्रामपंचायतींनी तत्काळ कचऱ्याचे व्यवस्थापन प्रकल्प करावा. तसेच एमआयडीसीमधील कंपन्या किंवा छोटे वर्कशॉपवाल्यांनी कचरा रस्त्याच्या कडेला टाकल्यास त्यांच्यावर ग्रामपंचायत स्तरावर दंडात्मक कारवाई करावी, अन्यथा गुन्हा दाखल करावा, अशा सूचना टोणपे यांनी बैठकीत केल्या आहेत.

शरद बुट्टे पाटील म्हणाले, एमआयडीसी टप्पा क्रमांक पाचव्या टप्प्यातील ग्रामपंचायतींनी कचरा प्रकल्पासाठी गायरान जागेचे प्रस्ताव दाखल करावेत. भविष्यात कंपन्यांमुळे गावची लोकसंख्या वाढणार आहे. घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन उत्तम प्रकारे करावे. मोठ्या गावांना स्वच्छतागृहासाठी निधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले. आभार ग्रामसेवक काकासाहेब मिंड यांनी मानले.

२५ आंबेठाण

ग्रामसेवक यांना मार्गदर्शन करताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद टोणपे.

Web Title: Gairan lands to be set up for waste projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.