गायतोंडें यांच्या पेंटिंगच्या विक्रमामुळे ‘आर्ट्स इन्व्हेस्टमेंट’ला चालना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:10 AM2021-03-20T04:10:15+5:302021-03-20T04:10:15+5:30
--वासुदेव गायतोंडे यांनी सुमारे ४० वर्षांपूर्वी केलेले पेंटिंग आज तब्बल ३९ कोटी रुपयांना विकले गेले. ४० वर्षांपूर्वी हे पेेंटिंग ...
--वासुदेव गायतोंडे यांनी सुमारे ४० वर्षांपूर्वी केलेले पेंटिंग आज तब्बल ३९ कोटी रुपयांना विकले गेले. ४० वर्षांपूर्वी हे पेेंटिंग ज्यांनी खरेदी केले त्यांना आज त्याच चित्राने लाखो पटीने फायदा मिळवून दिला. या घटनेमुळे ‘आर्ट्स इन्व्हेस्टमेंट’चे महत्त्व भारतीय समाजात चांगला रुजेल व लोक आता पेंटिंगमध्ये इन्व्हेस्ट करण्याला प्राधान्य देतील, अशी आशा ज्येष्ठ चित्रकार सिद्धार्थ नाईक यांनी व्यक्त केली.
पद्मश्री पुरस्कार विजेते दिवंगत वासुदेव गायतोंडे यांचे एक चित्र तब्बल ३९ कोटी ९८ लाख (५५ लाख अमेरिकन डॉलर) रुपयांना विकले गेले. भारतीय चित्रकलेच्या विश्वात एका पेंटिंगला मिळालेली ही आजपर्यंत सर्वात मोठी किंमत आहे त्यामुळे पेंटिंग विश्वात सध्या याची चर्चा सुरू आहे. त्यानिमित्ताने ज्येष्ठ चित्रकार सिद्धार्थ नाईक यांच्याशी पेंटिंगबद्दल साधलेला हा संवाद.
नाईक म्हणाले की, गायतोंडे यांच्या ४० वर्षांपूर्वी काढलेल्या या चित्राला मिळालेली किंमत ही भारतीय बाजारामध्ये एक माइलस्टोन आहे, हे खरे आहे. तरीही जागतिक बाजाराचा विचार करता ही किंमत नॉर्मल आहे. कारण लिओनार्दो द विंची यांच्या चित्राला काही वर्षांपूर्वी तब्बल ४५० लाख अमेरिकन डॉलर अर्थात २,९४० करोड रुपयांमध्ये विकले गेले आहे. मात्र गायतोंडे यांच्या चित्राच्या विक्रमामुळे तसा दृष्टिकोन भारतीय बाजारात येत आहे याचा निश्चित आनंद चित्रकारांच्या जगात आहे.
गायतोंडे यांनी १९६१ साली हे चित्र तयार केले होते आणि १९६२ मध्ये आदिती व आदित्य मंगलदास यांनी हे चित्र त्यांच्याकडून खरेदी केले होते. सुमारे ४० वर्षे त्यांच्या घरामध्ये त्यांनी या पेंटिंगच्या सायलेंट फिलचा आनंद घेतला व पुन्हा त्यांनी या चित्राचा लिलाव केला तेव्हा त्यांना तब्बल ३९.९८ कोटी रुपये मिळाले. त्यामुळे चांगली पेंटिंग तुम्हाला वर्षानुवर्षे उत्तम आनंद देतेच व हजारो पटीने त्याची किंमत वाढलेली असते त्यामुळे कोणत्याही औदासिन्य मूल्यांच्या (डिप्रीशिअन व्हॅल्यू) वस्तू खरेदी करण्यापेक्षा उत्तम पेंटिंग खरेदी करणे किती लाभदायक असते हेच यावरून सिद्ध होते.
गायतोंडे यांनी काढलेले या चित्रामध्ये समुद्राचा रंग आहे व एक लाल ठिपका आहे. याचा नेमका अर्थ काय असे अनेक जण विचारात, मात्र चित्राचा अर्थ हा ते चित्र पाहणाऱ्या रसिकाच्या अभिरुचीप्रमाणेच भिन्न असते. त्यामुळे त्याचा अमुक एकच अर्थ असेल असे सांगणे चुकीचे ठरेल. मात्र चित्रकाराने त्याचा जीव त्या चित्रात ओतला की चित्र अप्रतिम होते व पाहणाऱ्याला ते भावते. त्यामुळे नव्या चित्रकारांना आम्ही हेच सांगत असतो की, चित्र काढताना तुम्ही स्वत:ची कल्पना त्यात मांडा, जीव ओतून ते रेखाटा. समुद्राचा निळा रंग आणि त्यावर लाल ठिपका दिला की गायतोंडे यांनी काढलेल्या चित्रासारखे चित्र प्रत्येकाला काढता येईल मात्र त्याला तितकी किंमत मिळणार नाही जितकी गायतोंडे यांच्या चित्राला मिळाली. त्यामुळे तुमच्या चित्रामध्ये तुमची प्रतिभा दिसणे महत्त्वाचे आहे.
---
चौकट
माणसांची व घराची ओळख निर्माण करण्याची चित्रामध्ये ताकत
--
चित्रांमध्ये प्रचंड ताकत असते. तुमच्या घराची किंवा तुमची ओळख निर्माण करण्याचे काम तुमच्या घरात लावलेले चित्र करत असतात. एखाद्या घरामध्ये कशा प्रकारचे चित्र लावले आहे ते पाहून चित्र पाहणारे त्या घराविषयी व घरातील माणसांच्या व्यक्तिमत्वाविषयीचा समज तयार करत असतात. त्यामुळे घरात, कार्यालयात, हॉटेल व दुकानात तुम्ही तुमची वेगळी ओळख निर्माण करणारे चित्र लावले पाहिजे, असे मत सिद्धार्थ नाईक यांनी सांगितले.
--