पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणेची नागपूर कारागृहातून सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2022 08:43 PM2022-03-06T20:43:23+5:302022-03-06T20:43:42+5:30
तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर रॅली काढल्याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक करुन गुंड गजानन मारणे याच्यावर एम पी डी ए कायद्यान्वये १ वर्ष स्थानबद्ध केले होते
पुणे : तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर रॅली काढल्याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनीअटक करुन गुंड गजानन मारणे याच्यावर एम पी डी ए कायद्यान्वये १ वर्ष स्थानबद्ध केले होते. ही एक वर्षाची मुदत संपल्यानंतर नागपूर कारागृहातून रविवारी दुपारी २ वाजता गजानन मारणे याची सुटका करण्यात आली आहे. अशी माहिती ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी दिली. त्यामुळे तब्बल ८ वर्षानंतर गजानन मारणे हा तुरुंगाबाहेर असणार आहे.
कुख्यात गुंड गजानन मारणेची दोन खून खटल्यातून मुक्तता झाल्यानंतर त्याच्यावर आणखी खटले नसल्याने त्याची १६ फेब्रुवारी २०२१ रोजी तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली होती. कारागृहातून बाहेर येताच गुंड गजानन मारणे टोळीने बेकायदा जमाव जमवून फटाके वाजवले. तसेच आरडाओरडा करुन दहशत निर्माण केली. हा प्रकार मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर उर्से टोल नाका येथे घडला. याप्रकरणी मारणेसह त्याच्या साथीदारांवर पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलिसांत वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. ग्रामीण पोलिसांनी त्याला अटक करुन वडगाव मावळ न्यायालयात हजर केले.
न्यायालयाने जामीन मंजूर करताच तो न्यायालयाच्या आवारातून पसार झाला होता. पुणे, पिंपरी चिंचवड व ग्रामीण पोलीस त्याचा शोध घेत होते. ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी एम पी डी ए कायद्याखाली प्रस्ताव तयार करुन जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे पाठविला होता. त्यांनी तो मंजूर केला. मात्र, तेव्हा गजानन मारणे फरार होता. ग्रामीण पोलिसांनी त्याला जावळी तालुक्यातील मेढा येथे ७ मार्च २०२१ रोजी अटक करुन त्याची कारागृहात रवानगी केली होती. पुण्यातून त्यानंतर त्याला नागपूर कारागृहात हलविण्यात आले होते. त्याची मुदत आज संपल्याने त्याची आज दुपारी २ वाजता नागपूर कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. गजानन मारणे याच्या काढलेल्या रॅलीमधील बहुतांश गुंडावर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यामुळे आता पुणे पोलीस काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.