गजानन मारणे व ८ साथीदारांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला; जंगी मिरवणूक प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2021 08:26 PM2021-03-04T20:26:47+5:302021-03-04T20:27:44+5:30
तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर १५ फेब्रुवारी रोजी मारणे टोळीने मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर सुमारे ३०० गाडयांसह मिरवणुक काढली होती.
पुणे : तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर पुण्यापर्यंत जंगी मिरवणूक काढल्याप्रकरणी हिंजवडीपोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात गुंड गजानन मारणे आणि त्याच्या ८ साथीदारांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. भांगडिया यांनी हा आदेश दिला.
गजानन ऊर्फ गजा पंढरीनाथ मारणे (वय ४८, रा. शास्त्रीनगर), रुपेश कृष्णराव मारणे (वय ३८), सुनील नामदेव बनसोडे (वय ४०, दोघेही रा. कोथरूड), श्रीकांत संभाजी पवार (वय ३४), गणेश नामदेव हुंडारे (३९), सचिन अप्पा ताकवले (वय ३२), प्रदीप दत्तात्रेय कंधारे (वय ३६), बापू श्रीमंत बागल (वय ३४) आणि अनंता ज्ञानोबा कदम (वय ३७) यांचा जामीन फेटाळण्यात आला आहे. तर मेहबूब मोर्तुजा महम्मद सय्यद (वय ३३), राजशेखर यलप्पा बासगे (वय २६), जयवर्धन जयपाल बिरनाळे (वय २४), लक्ष्मण एकनाथ आल्हाट (वय ४०), सुनील ज्ञानोबा कांबळे (वय ३१), आशिष बापूराव पिसाळ (वय २२) आणि इतर १५० समर्थकांवर गुन्हा दाखल आहे.
गजानन मारणे व त्याच्या साथीदारांविरुद्ध कोथरुड, वारजे, हिंजवडी, बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांपैकी हिंजवडी पोलीस ठाण्यातील गुन्ह्याप्रकरणी मारणे व त्याच्या साथीदारांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता.
तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर १५ फेब्रुवारी रोजी मारणे टोळीने मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर सुमारे ३०० गाडयांसह मिरवणुक काढली होती. या मिरवणुकीचे चित्रीकरण करुन ते सोशल मिडियावर व्हायरल करुन समाजात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मारणे व त्याच्या साथीदारांना नोटीस देऊनही ते हजर झालेले नाही. या गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त करण्यात येत आहे. हा सर्व प्रकार करण्यासाठी त्यांना कोणी पैसे पुरवले याचा तपास करायचा आहे. त्यामुळे आरोपींना अटक करणे गरजेचे आहे, असा युक्तिवाद जामिनाला विरोध करताना अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी केला. सरकार पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.
आजपर्यंत पोलिसांनी केलेला तपास
मिरवणुकीत वापरलेली ११ वाहने निष्पन्न झाली आहेत
रॅलीचे उर्से व पुणे शहरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती आले आहे
८ साक्षीदारांकडे तपास करून त्याचे जबाब नोंदवले आहेत
आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन तपास पथकांची नेमणूक
व्हायरल फोटो आणि व्हिडिओची माहिती मिळवण्यात येत आहे
आरोपींवर दाखल गुन्हे
गजानन मारणे- २३
रूपेश मारणे- १२
सुनील बनसोडे - १४