शौर्यपदकविजेत्यांना घरपट्टी माफ
By admin | Published: October 14, 2016 05:05 AM2016-10-14T05:05:41+5:302016-10-14T05:05:41+5:30
राष्ट्रपतींचे शौर्यपदक विजेते सैनिक, पोलीस यांना महापालिकेच्या हद्दीतील त्यांच्या एका मालमत्तेचा मिळकत कर कायमस्वरूपी माफ करण्याला
पुणे : राष्ट्रपतींचे शौर्यपदक विजेते सैनिक, पोलीस यांना महापालिकेच्या हद्दीतील त्यांच्या एका मालमत्तेचा मिळकत कर कायमस्वरूपी माफ करण्याला पालिकेच्या सर्वसाधारण सभेने गुरुवारी संमती दिली. हा निर्णय घेऊन पालिकेने देशासाठी, नागरिकांच्या संरक्षणासाठी प्रसंगी प्राणांची बाजी लावून कर्तव्य बजावणाऱ्यांप्रति आदर व्यक्त केला आहे. पालिकेच्या सेवेतील अग्निशामक दलाच्या जवानांचाही यात समावेश करण्यात आला आहे.
कर्तव्य बजावत असताना मृत्युमुखी पडलेल्यांच्या विधवा पत्नी अथवा नातेवाइकांच्या नावे जॉईंट मालमत्ता असेल तर त्यांनाही या योजनेचा लाभ मिळेल. दोन मालमत्ता असेल तर फक्त एकाच मालमत्तेचा कर माफ असेल.
नगरसेवक अविनाश बागवे यांनी हा ठराव स्थायी समितीमध्ये आणला होता. त्याला तिथे मंजुरी मिळाल्यानंतर तो गुरुवारी सर्वसाधारण सभेत चर्चेला आला. विनाचर्चा त्याला मंजुरी मिळाली. राष्ट्रपतींचे शौर्यपदकविजेत्या पोलिसांचाही ते पालिका हद्दीत राहात असतील व त्यांची इथे मालमत्ता असेल तर तिचाही समावेश करण्याची उपसूचनाही या वेळी मंजूर करण्यात आली.
अग्निशामक दलात राष्ट्रपतींचे शौयपदक विजेते ४ जवान आहेत. त्यांनाही या निर्णयाचा लाभ मिळेल. त्यांच्या अथवा पत्नीच्या नावे असलेल्या मालमत्तेचा कर कायमस्वरूपी माफ करण्यात येईल. तसेच पोलीस दलातही असे राष्ट्रपतींचे शौर्यपदक मिळालेले पोलीस आहेत. उपसूचनेमुळे त्यांचाही समावेश आता या निर्णयात झाला आहे. सभागृहाने एकमताने या विषयाला मंजुरी दिली. (प्रतिनिधी)