पुण्याच्या स्वारगेट परिसरातील जुगार अड्डा गुन्हे शाखेकडून उध्वस्त; 14 जुगारी ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 08:22 PM2023-04-12T20:22:19+5:302023-04-12T20:22:42+5:30
विशेष म्हणजे शहरातील प्रसिद्ध सारसबागेपासून हाकेच्या अंतरावर हा जुगाराचा अड्डा सुरू होता
पुणे/ किरण शिंदे: गुन्हे शाखेच्या पथकाने स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जुगाराचा अड्डा उध्वस्त केला. सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने या ठिकाणाहून जुगार खेळणाऱ्या 13 जणांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे शहरातील प्रसिद्ध सारसबागेपासून हाकेच्या अंतरावर हा जुगाराचा अड्डा सुरू होता.
ताब्यात घेतलेल्या या जुगाऱ्यांवर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये स्वारगेट पोलिसांना एका गुन्हा पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगाराचा ही समावेश आहे. सोमवारी ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सारसबागेच्या मागे असणाऱ्या नाल्याजवळ पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीर रमी पत्ती जुगार चालू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने पाळत ठेवून छापा टाकत कारवाई केली. यावेळी पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या 14 जणांना ताब्यात घेतले. पोलिसांनी या ठिकाणाहून तब्बल 28 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेल्या कारवाई या ठिकाणी एका सराईत गुन्हेगाराला पकडण्यात यश आले. स्वारगेट पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात तो पोलिसांना सापडत नव्हता.