ऑनलाईन गेम्सद्वारे ‘गॅम्बलिंग’, तरुणांमध्ये वाढतंय खेळण्याचे ‘फॅड’ अन् होतायेत कर्जबाजारी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 11:32 AM2022-04-05T11:32:57+5:302022-04-05T11:33:57+5:30
पुणे : कोणती क्रिकेटची टीम जिंकणार किंवा रमीमध्ये कोणती तीन पत्ती लागणार? यावर आकडे लावून ज्याची तीन पत्ती अथवा ...
पुणे: कोणती क्रिकेटची टीम जिंकणार किंवा रमीमध्ये कोणती तीन पत्ती लागणार? यावर आकडे लावून ज्याची तीन पत्ती अथवा टीमचा अंदाज अचूक येईल, त्याला पैसे मिळतात. सार्वजनिक बंदी असलेला हा जुगार आता ऑनलाईन पद्धतीने खेळला जात आहे. यासाठी खास विंझो, माय इलेव्हन सर्कल, रमी सर्कल, जंगली रमी आणि ड्रीम्स ११ यासारख्या ऑनलाईन गेमिंग ॲप्सची निर्मिती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या ॲप्सची तरुणाईमध्ये मोठी क्रेझ आहे. या खेळाच्या जुगारामध्ये पैसे हरल्याने अनेक तरुण कर्जबाजारी झाले आहेत, तर काहींनी आत्महत्येचा मार्ग पत्करला आहे.
मुंबई जुगार प्रतिबंधक कायदा १८८७ हा महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम (१८८७) कायदा म्हणून राज्यभर लागू आहे. कायद्यांतर्गत सार्वजनिक ठिकाणी जुगार किंवा मटका खेळण्यास मनाई आहे. कोणीही व्यक्ती जुगार खेळताना आढळल्यास त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारला जातो. पण या मनाईमुळे पारंपरिक आकडे लावून चालणारा जुगार आता सर्रासपणे ऑनलाईन खेळला जात आहे. सध्याचे कायदे हे ब्रिटिशांच्या काळातील असून, त्यात कालपरत्वे बदल होणे अपेक्षित आहे. त्यानुसार या ऑनलाईन जुगारावर नियंत्रण आणण्याकरिता प्रचलित कायद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकारला नवीन कायद्याचा मसुदाही सादर केला आहे, परंतु, अद्यापही तो कागदावरच आहे.
नवीन मसुद्यात कोणत्या तरतुदी?
महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा (१८८७) यात बदल करून मोबाईल ॲप्लिकेशन किंवा लिंकद्वारे गेमच्या नावाने महसुली कर आणि विविध कर बुडविणारा जुगार नियंत्रणात आणण्यासाठी जुगार चालविणाऱ्यावर तीन ते सात वर्षांसाठी कारावास, पाच लाखाच्या दंडाची शिक्षेची तरतूद सुचविली आहे. किमान २५ टक्के तरी कर आकारला जावा, असे त्यात नमूद आहे.