सिद्धनाथाच्या यात्रेत शिखरी काठ्यांचा खेळ
By Admin | Published: April 10, 2017 02:00 AM2017-04-10T02:00:37+5:302017-04-10T02:00:37+5:30
श्रीक्षेत्र नायगाव येथे चैत्र पौर्णिमा तथा हनुमान जयंतीनिमित्त यात्रा भरते. या यात्रेचे वेगळेपण म्हणजे पुरंदरसह
सासवड : श्रीक्षेत्र नायगाव येथे चैत्र पौर्णिमा तथा हनुमान जयंतीनिमित्त यात्रा भरते. या यात्रेचे वेगळेपण म्हणजे पुरंदरसह आसपासच्या तालुक्यांतील काही गावांतील मानाच्या काठ्यांचे शिखर स्पर्धेचे आकर्षण असते आणि यानिमित्त हजारो भाविक हा सोहळा पाहण्यासाठी उपस्थित असतात.
सिदोबाचे नायगाव म्हणून या गावाची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे. नवसाला पावणारा आणि भक्तांच्या हाकेला धावणार म्हणून हजारो भाविकांची श्री सिद्धनाथावर श्रद्धा आहे. वर्षातील सर्व पौर्णिमा, रविवार, मंगळवार या दिवशी नायगावला भाविकांची गर्दी असते आणि श्री काळभैरवनाथ जन्माष्टमी आणि चैत्र पौर्णिमा तथा हनुमान जयंतीला याठिकाणी यात्रा भरते. चैत्र पौणिमेची यात्रा मोठी असून साधारण तीन दिवस चालते.
हनुमान जयंती तथा चैत्र पौर्णिमेच्या आधीच्या दिवशी श्री सिद्धनाथ महाराज आणि माता जोगेश्वरी यांचा हळदीचा कार्यक्रम होतो. चैत्र पौर्णिमेला सकाळी ७ वाजता हनुमान जन्मोत्सव होतो, त्यानंतर श्रींच्या पालखीही सवाद्य आणि खेळगड्यांच्या उपस्थितीत ग्रामप्रदक्षिणा होते.
या वेळी परिट समाजाकडून पालखीपुढे पायघड्या अंथरण्यात येतात, त्यावेळी पालखीपुढे लहान मुलांना झोपवून देव अंगात संचारलेले भक्त व पालखीने त्यांना ओलांडण्याची पारंपरिक प्रथा पाहायला मिळते. दिवसभर नवसाची दंडवते आणि गूळ व प्ोढ्यांची शेरणी वाटप होते. सायंकाळी मनाच्या काठ्यांचे स्वागत, मिरवणूक आणि रात्री ८ वाजता शिखर भेट स्पर्धा होते. रात्री १० वाजता श्रींच्या पालखीची वाजत-गाजत मिरवणूक निघते. आलेल्या प्रत्येक काठीच्या विसाव्याठिकाणी पालखी जाते, त्याठिकाणी पारंपरिक पद्धतीने घोंगडी अंथरून काठीच्या मानकऱ्यांचा मानाचा विडा देण्याचा कार्यक्रम होतो, तर पेरणेकरांकडून श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरीला जोडे ठेवण्याचा पारंपरिक कार्यक्रम संपन्न होतो. रात्रभर मंदिरासमोर छबिना सुरु असतो.
पहाटे ३ नंतर सर्व काठ्यांच्या तळावर जाऊन पालखी देऊळवाड्यात परतते. दुसऱ्या दिवशी सकाळी आणि सायंकाळी लोकनाट्य तमाशा फड रंगतो व दुपारी ४ वाजता कुस्त्यांचा जंगी आखाडा भरतो. (वार्ताहर)
४यानिमित्त परिसरात सासवड, पारगाव, सिंगापूर, एखतपूर, मुंजवडी, कोथळे (ता. पुरंदर), पेरणे (ता. हवेली), एल्केभादे (ता. खंडाळा), न्हावरे (ता. शिरूर) आणि भोंडवेवाडी (ता. बारामती) येथील काठ्यांची शिखर भेट स्पर्धा होते. हे या यात्रेचे मुख्य आकर्षण असते.
४हा सोहळा अनेक वर्षानुवर्षे सुरू आहे. मागील काही वर्षांपूर्वी दुष्काळामुळे परिसरातील अनेक गावांनी आपल्या यात्रा रद्द केल्या होत्या. मात्र, नायगावमध्ये असा प्रकार कधीही झालेला नाही.