चालकांच्या जीवाशी खेळ

By admin | Published: February 20, 2016 12:51 AM2016-02-20T00:51:52+5:302016-02-20T00:51:52+5:30

पोलिसांनी दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्ती कायद्याची अंमलबजावणी कठोरपणे केल्यामुळे दंडातून वाचण्यासाठी हेल्मेटची मागणी वाढली आहे

Games with the driver's life | चालकांच्या जीवाशी खेळ

चालकांच्या जीवाशी खेळ

Next

पिंपरी : पोलिसांनी दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्ती कायद्याची अंमलबजावणी कठोरपणे केल्यामुळे दंडातून वाचण्यासाठी हेल्मेटची मागणी वाढली आहे. याचा फायदा घेत शहरात रस्त्या-रस्त्यांवर बनावट हेल्मेटची विक्री वाढली आहे. आयएसआयचा लोगो लावून हे हेल्मेट बिनदिक्कतपणे विकले जात आहेत. वाहनचालकांच्या जीवाशी खेळण्याचा हा धंदा उघडपणे सुरू आहे. याकडे वाहतूक पोलीस, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), दुकान निरीक्षक कार्यालय (शॉप अ‍ॅक्ट लायसन्स), महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे.
कासारवाडी, भोसरी, वाकड, रहाटणी, निगडी, आकुर्डी, चिंचवड, दापोडी, काळेवाडी, थेरगाव, पिंपरी, देहूरोड, सांगवी, पिंपळे गुरव, हिंजवडी आदी ठिकाणी रस्त्यावर हेल्मेटविक्री जोरात सुरू आहे. विशेषत: महामार्गावर हेल्मेटविक्रेत्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्याचबरोबर टपरी आणि किराणा दुकानातही हेल्मेटने स्थान मिळविले आहे. शहरात ठरावीक हेल्मेट दुकानदार आहेत. तसेच, मॉलमध्येही नियमित विक्री सुरू असते.
रस्त्यावर मात्र रिकामे बॉक्स एकमेकांवर रचून त्यांवर हेल्मेट ठेवून विक्री सुरू आहे. विविध प्रकारांतील हे हेल्मेट अधिकृत किंवा बनावट हे ओळखणे अवघड जाते. नामांकित कंपन्यांपेक्षा दिल्ली मेड आणि स्थानिक बनावटीचे हेल्मेट अधिक स्वस्त आहेत. नामांकित कंपनीच्या हेल्मेटची किंमत हजार ते आठ हजार रुपयांपर्यंत आहे. स्पोटर््स हेल्मेटच्या किमती याही पुढे आहेत.
स्वस्तातील २०० ते ५०० रुपयांपर्यंतचे हेल्मेट खरेदीकडे सर्वसामान्य नागरिकांचा कल आहे. त्यामुळे त्यांची फसवणूक होत आहे. बनावट असलेले हेल्मेट नागरिकांच्या माथी मारले जात आहे. साधा बेल्ट, सुमार दर्जाची बांधणी, आतील कापडाचा कमकुवत दर्जा असे कमी दर्जाचे हलके हेल्मेट स्वस्तात विकले आहेत. त्यावर आयएसआय मानांकनाचा बनावट लोगो लावले आहेत. त्यामुळे ग्राहकांत संभ्रम होतो. आयएसआय मानांकनाचे हेल्मेट असल्याचे समजून ते बनावट हेल्मेट खरेदी करीत आहेत. काही दुकानांमध्येही बनावट आणि हलक्या दर्जाचे हेल्मेट विक्रीस असल्याचे दिसून आले.
कमिशनपोटी अनेक जणांनी हेल्मेटविक्रीचा धंदा सुरू केला आहे. मागणी वाढल्याच्या काळात आपला फायदा करून घेण्यासाठी कोणीही उठून हेल्मेट विकत आहे. त्यासाठी कोणताही विक्री परवाना त्यांच्याकडे नाही. त्यामुळे हे हेल्मेट कोणत्या दर्जाचे आहेत, यांच्याशी त्यांना काही देणे नाही. केवळ आर्थिक फायद्यासाठीच धंदा जोरात आहे.
याबाबत दुकाने निरीक्षक बेग यांनी सांगितले, ‘‘हेल्मेट ही बाब आरटीओच्या अंतर्गत येते. बनावट विक्री होऊ नये, यासाठी त्यांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. हेल्मेट विक्रीशी दुकान निरीक्षक कार्यालयाचा
संबंध येत नाही. त्याच्याशी आमचा संबंध नाही.’’(प्रतिनिधी)कारवाई टाळण्यासाठी हेल्मेट
दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्तीचे केले आहे. त्याची कारवाई वाहतूक पोलिसांनी नुकतीच सुरू केली. हेल्मेट नसलेल्या चालकास १०० रुपये दंड आकारणी केली जाते. दंड वाचविण्यासाठी काही दुचाकीचालक हेल्मेट परिधान करतात. परिणामी, हलक्या दर्जाचे बनावट हेल्मेट वापरले जातात. चौकात वाहतूक पोलीस दिसल्यास डोक्यावर हेल्मेट घातले जाते. चौक पार झाल्यानंतर ते उतरविले जाते. काही जण डोक्यावर हेल्मेट न घालता, दुचाकीला अडकवून फिरताना दिसतात. रिक्षाचालकांकडे दुर्लक्ष का?
हेल्मेटसक्तीच्या दंडाच्या माध्यमातून पोलीस प्रशासन कोट्यवधी रुपयांचा महसूल जमा करते. अपघात झाल्यास वाहनचालक जखमी होऊ नये किंवा त्यांचा मृत्यू होऊ नये म्हणून हेल्मेटसक्ती असल्याचे पोलिसांकडून सांगितले जाते. मात्र, त्यांच्या समोरूनच रिक्षांतून प्रवाशी अक्षरश: कोंबून नेले जातात. त्याकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. कारवाईतील हा दुजाभाव का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. यावरून केवळ महसूल वाढीवर पोलिसांचा डोळा असल्याचे स्पष्ट होते.विक्रेत्यांकडे नाहीत परवाने
रस्त्यांवर नव्याने तयार झालेले अनेक विक्रेते दृष्टीस पडतात. बाहुल्या, बॅट, खेळणी आणि इतर साहित्य विकणारेही हेल्मेट विकत आहेत. या अनधिकृत विक्रेत्यांकडे दुकाने निरीक्षक यांचा नोंदणी दाखला नाही. तरीही ही मंडळी बिनधास्तपणे हेल्मेटची विक्री करीत आहेत. त्यांना कोणीही हटकत नाही. दुकाने निरीक्षक कार्यालय, आरटीओ, वाहतूक पोलीस आणि महापालिका प्रशासनाकडून या अनधिकृत विक्रेत्यांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे ते उघडपणे हेल्मेटविक्री करीत आहेत.
आयएसआय मानांकन असलेल्या उत्तम दर्जाच्या हेल्मेटची विक्री झाली पाहिजे. त्यासाठी दक्षता घेणे गरजेचे आहे. हलक्या प्रतीची हेल्मेट विक्री केली जाऊ नये. दुकान निरीक्षक कार्यालयाने अशा विक्रेत्यांवर कारवाई करावी.- अजित शिंदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

सुरक्षा आणि दर्जा मानांकन पूर्ण करणाऱ्या साहित्यांना आयएसआय मानांकन संस्था प्रमाणपत्र देते. अशा लोगोचा गैरवापर करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे. त्यांनी अशा विक्रेत्यांवर कारवाई करावी. बनावट हेल्मेट विक्रेत्यांवर कारवाई करण्याचा वाहतूक पोलिसांचा काही संबंध येत नाही. वाहतूक शिस्त नियमन आणि कायदा पालन करण्याचे वाहतूक पोलिसांचे कार्य आहे.
- महेंद्र रोकडे, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक विभाग

Web Title: Games with the driver's life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.