जीएसटीमुळे यंदा गणपतीबाप्पा महागणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 06:30 AM2017-07-27T06:30:04+5:302017-07-27T06:30:07+5:30
गणेशोत्सवाला अवघ्या महिनाभराचा कालावधी बाकी असल्याने गणेशभक्तांना बाप्पाचे आगमनाचे वेध लागले आहेत. सार्वजनिक मंडळांबरोबरच कुंभारवाड्यातही लगबग पाहायला मिळू लागली आहे
भूगाव : गणेशोत्सवाला अवघ्या महिनाभराचा कालावधी बाकी असल्याने गणेशभक्तांना बाप्पाचे आगमनाचे वेध लागले आहेत. सार्वजनिक मंडळांबरोबरच कुंभारवाड्यातही लगबग पाहायला मिळू लागली आहे. गणेशमूर्ती विक्रीसाठी नेण्यापूर्वी कारागीर रंगरंगोटीचे काम पूर्ण करण्यात व्यस्त आहेत. जीएसटी लागू झाल्याने गणेशमूर्तीच्या किमतीही जवळपास ३० ते ३५ टक्के महाग झाल्या आहेत.
दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून रात्रीचा दिवस करीत गणेशमूर्ती तयार करण्यात व्यस्त असलेले कारागीर अखेरचा हात मारून रंगरंगोटीचे काम पूर्ण करीत आहेत. अनेक कारागीर गणेशमूर्ती, तसेच गौरीचे आकर्षक मुखवटे तयार करीत आहे. यावर्षी मल्हार, बिंदूसार, महाराजा, लालबागचा राजा, मयूरेश्वर आदींसह अष्टविनायकांच्या रूपातील गणेशमूर्तींची मागणी लोकांकडून होत आहे. याही वर्षी विविध प्रकारच्या मुर्त्या उपलब्ध असणार आहेत. आगाऊ बुकिंग केल्यास मूर्तीमध्ये थोडा नफा मिळत असला, तरी गणेश चतुर्थीच्या दिवशी मूर्ती वर्षभर सांभाळण्यापेक्षा आल्या त्या भावात मूर्ती विकायला लागते; तसेच वर्षातून काही दिवसांचेच हे काम असल्याने त्यानंतर रोजगारासाठी कुठलीही कामे करावी लागतात, अशी शोकांतिका एका मूर्ती विक्रेत्याने व्यक्त केली.
रंगसाहित्य, प्लास्टर व अन्य गोष्टींवर जीएसटी लागू झाल्याने मूर्तीकाम महागले आहे. त्याचा परिणाम यावर्षी मूर्तीकामावर झाला असून यावर्षी गणेशमूर्तीच्या किमतीही जवळपास ३० ते ३५ टक्के महाग झाल्या आहेत. लहान घरगुती मूर्तींपासून मोठ्या मूर्तींच्या दरात वाढ झाली. -दत्ता नेहे, मूर्तीकार, भूगाव