गणपती बाप्पा, मोरयाऽऽ
By admin | Published: August 29, 2014 04:24 AM2014-08-29T04:24:44+5:302014-08-29T04:24:44+5:30
बुद्धीच्या, क लेच्या आणि ‘जे जे सुंदर, उदात्त उन्नत’ अशा गणरायाचा उत्सव म्हणजे आनंद आणि उत्सवाला आमंत्रणच.
पुणे : बुद्धीच्या, क लेच्या आणि ‘जे जे सुंदर, उदात्त उन्नत’ अशा गणरायाचा उत्सव म्हणजे आनंद आणि उत्सवाला आमंत्रणच. आज दिवसभर शहरातल्या मध्यवर्ती बाजारपेठांतही हा आनंद गर्दीच्या रूपाने जणू ओसंडून वाहत होता. संध्याकाळनंतर मात्र पावसाने काही भागांत जोराची हजेरी लावली, तरी गणेशभक्तांच्या खरेदीवर त्याचा फारसा परिणाम झाला नाही.
गेल्या काही दिवसांपासून श्रींच्या मूर्तीचे स्टॉल लागले आहेत़ शहराच्या चौकाचौकांत गणेशमूर्तींचे स्टॉल लागले असल्याने भाविकांना खूप पर्याय उपलब्ध होते़ त्या ठिकाणी जाऊन अनेकांनी अगोदरच श्रींच्या मूर्तीचे बुकिंग केले होते़ पावसाची शक्यता लक्षात घेऊन बऱ्याच
जणांनी घरातील उत्सवासाठी नेहमीपेक्षा आधीच गणेशमूर्ती आणणे पसंत केले होेते.
शनिवारवाडा येथील स्टॉलवर गर्दी झाली होती़ अनेक आबालवृद्ध खास ठेवणीतला पेहराव करून श्रींची मूर्ती घेण्यास आलेले दिसत होते़ आई, वडील, आजोबांसमवेत झब्बा-कुर्ता घालून आलेल्या लहानग्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता़ मूर्ती घेऊन जाताना येणारे ‘गणपती बाप्पा’च्या जयघोषाला इतरांकडून त्यांना ‘मोरया’ असा प्रतिसाद वातावरणात जल्लोष निर्माण करत होता.
या वर्षी पर्यावरणाचा विचार करून अनेक भाविक आवर्जून प्लॅस्टर आॅफ पॅरिसऐवजी शाडूची मूर्ती पसंत करताना दिसत होेते. चारचाकी, दुचाकी वाहनांमधून श्रींच्या मूर्ती नेण्याचे प्रमाण मोठे होते. या निमित्ताने अनेक घरांतील पांढऱ्या टोप्या बाहेर निघाल्या होत्या. सार्वजनिक गणपती मंडळांनी डीजेच्या दणदणाटात ट्रॅक्टर ट्रॉलीमधून गणपती नेणे पसंत केले.
सजावटीकरिता प्लॅस्टिक तसेच कागदाची फुले, रंगीबेरंगी कागद वापरून केलेली तयार सजावटही लक्ष वेधून घेत होती. आरास करताना दिव्यांच्या माळा मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. या वेळी फुलांच्या आकारातील माळांना जास्त मागणी आहे. नेहमीच खपणाऱ्या चायनीज माळा यंदाही मोठ्या प्रमाणात बाजारात आहेतच. गणपतीचे आवडते खाद्य मोदक उद्या घराघरांत नैवेद्याला असेल. यापैकी काही जणांनी घरीच ते बनवायचे ठरवले असून, काहींनी मात्र बाहेरून मोदक, पंचखाद्य यांची आॅर्डर दिली आहे. त्यामुळे उद्या घराघरांत गोडाचा सुगंध दरवळणार हे नक्की.(प्रतिनिधी)