गणपती बाप्पा मोरया...! जयघोषाने 'दगडूशेठ' मंदिराचा परिसर दुमदुमला, अंगारकीनिमित्त पारंपरिक पुष्पआरास
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 11:00 AM2023-01-10T11:00:57+5:302023-01-10T12:42:52+5:30
मंगळवारी पहाटे ३ वाजल्यापासून भाविकांकरीता दर्शनासाठी मंदिर खुले ठेवण्यात आले होते
पुणे : गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरया...ओम् गं गणपतये नम :... अशा गणेश नामाच्या जयघोषाने 'दगडूशेठ' गणपती मंदिराचा परिसर दुमदुमून गेला. नववर्षातील पहिला व या वर्षातील एकमेव अंगारकी संकष्टी चतुर्थी योग असल्याने भाविकांनी दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली. मंदिराच्या कळसापासून ते गाभा-यापर्यंत विविधरंगी फुलांनी केलेली पारंपरिक आकर्षक पुष्पसजावट आणि विद्युतरोषणाने संपूर्ण श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर उजळून निघाले होते.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपती मंदिरामध्ये पहाटे स्वराभिषेकाचे आयोजन करण्यात आले. यावेळी गायक जितेंद्र अभ्यंकर यांनी गायनसेवा दिली. त्यापूर्वी ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक झाला. स्वराभिषेकानंतर श्री गणेशयाग देखील पार पडला. याशिवाय श्रीं ची मंगलआरती आदी कार्यक्रम मंदिरात पार पडले.
मंदिरावर केलेल्या पुष्पसजावटीकरिता झेंडू, गुलाब, शेवंती, कामिनी आदी फुले वापरुन पारंपरिक सजावट करण्यात आली होती. तर, मंदिरावर व सभामंडपात गुलछडीची झुंबरे देखील साकारण्यात आली. मंगळवारी पहाटे ३ वाजल्यापासून भाविकांकरीता दर्शनासाठी मंदिर खुले ठेवण्यात आले होते. त्यामुळे भाविकांनी पहाटेपासूनच मोठया संख्येने गर्दी केली. श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर रस्ता, अप्पा बळवंत चौकाच्या पुढे पर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. मंदिरावर आकर्षक तोरण आणि रांगोळ्यांची सजावट देखील करण्यात आली होती.