लोकमत ‘ती’ चा गणपती दिमाखात विराजमान; ‘लोकमत’ हाती घेतलेली ‘श्रीं’ची लक्षवेधक मूर्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2023 10:53 AM2023-09-20T10:53:43+5:302023-09-20T10:58:08+5:30
‘लोकमत’ने कायमच वेगवेगळ्या उपक्रमांची मुहूर्तमेढ पुण्यात रोवली आहे...
पुणे : आकर्षक रंगावली.... ढोल-ताशांचा गजर अशा पारंपरिक वातावरणात देशातील पहिले महिला गणपती मंडळ अशी ख्याती असलेल्या लोकमत ‘ती’च्या गणपतीची प्राणप्रतिष्ठापना विधिवत झाली. ‘श्रीं’च्या आगमानाने जणू आसमंतात चैतन्याचे रंग भरले. लोकमत ‘ती’च्या ‘श्रीं’ची सायंकाळची आरती भाजप महिला आघाडीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा मेधा कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम आणि अभिनेत्री ईशा अगरवाल यांच्या हस्ते करण्यात आली.
‘लोकमत’ने कायमच वेगवेगळ्या उपक्रमांची मुहूर्तमेढ पुण्यात रोवली आहे. ‘ती’चा गणपती असाच एक विधायक उपक्रम. गेल्या दहा वर्षांपासून महिलांच्याच हस्ते ‘श्रीं’ची मूर्ती विराजमान करण्याची प्रथा लोकमतने सुरू केली. पुण्यनगरीनेही या विधायक उपक्रमाचे भरभरून कौतुक व स्वागत केले.
यंदाही पुनीत बालन प्रस्तुत व न्यातीच्या सहयोगाने ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात ‘ती’च्या बाप्पाचे आगमन झाले. लोकमतचा अंक हातात घेतलेल्या ‘श्रीं’च्या मूर्तीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले. ‘ती’चा गणपतीच्या अध्यक्षा नम्रता फडणीस यांच्या हस्ते ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. ज्ञानप्रबोधिनीच्या जयश्री तडफळे यांनी पौराहित्य केले. तत्पूर्वी तक्ष ढोलताशा पथकाच्या वादकांनी जोरदार वादन करीत मंगलमयी वातावरणाची निर्मिती केली. नाकात नथ आणि पारंपरिक वेशभूषेतील महिलांचे वादन लक्ष वेधून घेत होते. रंगावलीकार रघुराज देशपांडे यांनी काढलेली सुबक रांगोळी सर्वांच्या पसंतीस उतरली.
‘ती’चा मिडनाईट बाईक रॅली थरार
‘लोकमत ती’च्या गणपतीच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून शनिवारी (दि. २३) ‘ती’च्या मिडनाईट बाईक रॅलीच्या माध्यमातून शहरातील रस्त्यांवरून स्त्री सुरक्षिततेचा जागर केला जाणार आहे.
‘ती’च्या आरतीचा तास
एरवी घरात ‘श्रीं’च्या आरतीच्या वेळी ती नैवेद्याचे ताट करण्यात गुंतलेली असते. ‘ती’ला आरतीचा मान मिळतोच असे नाही. पण लोकमतने ‘ती’ला देखील एका मंडळाच्या आरतीचा मान मिळावा यासाठी ‘ती’करिता आरतीचा तास हा उपक्रम सुरू केला आहे. येत्या २६ सप्टेंबरला सायंकाळी ७ वाजताची आरती महिलांच्या हस्ते करण्यात यावी. हा तास खास महिलांसाठी राखून ठेवावा, असे आवाहन ‘लोकमत’च्या वतीने सर्व मंडळांना करण्यात येत आहे.