ज्येष्ठाला मदत करण्याच्या बहाण्याने कार्ड बदली करून गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:15 AM2020-12-05T04:15:04+5:302020-12-05T04:15:04+5:30
पुणे : एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाला मदत करण्याच्या बहाण्याने कार्ड बदली करून ३२ हजार रुपये काढल्याचा प्रकार ...
पुणे : एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाला मदत करण्याच्या बहाण्याने कार्ड बदली करून ३२ हजार रुपये काढल्याचा प्रकार उघडकीस आला. मगरपट्टा परिसरातील स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये ही घटना घडली. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत कोलवडी येथील ६५ वर्षाच्या व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ७ सप्टेंबर रोजी ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे मगरपट्टा येथील स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये पेन्शंचे अकाउंट आहे. सात सप्टेंबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास ते पेन्शनचे पैसे काढण्यासाठी या बँकेच्या एटीएममध्ये गेले होते. तक्रारदार यांनी एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांच्याकडून पैसे निघाले नाहीत. त्यावेळी पाठीमागे उभ्या असलेल्या व्यक्तीने त्यांना पैसे काढून देण्याची तयारी दर्शवली. त्यांच्याकडून एटीएमकार्ड घेऊन हातचालाखीने दुसरेच कार्ड एटीएममध्ये टाकले. त्यानंतर तक्रारदार यांना पिन क्रमांक टाकायला सांगितला. तक्रारदार हे पिन क्रमांक टाकत असताना त्याने पाहिला. पण, तरीही पैसे निघाले नाहीत. त्यामुळे तक्रारदार यांना आरोपीने दुसरेच एटीएम कार्ड परत दिले. तक्रारदार हे दुसरेच एटीएम कार्ड घेऊन गेले. त्यानंतर आरोपीने त्यांच्या एटीएम कार्डचा वापर करून त्यांच्या बँक खात्यातून 32 हजार रुपये काढले. तक्रारदार यांना त्यांच्या खात्यातून पैसे कमी झाल्याचे आढळून आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. याप्रकरणी हडपसर पोलिस अधिक तपास करत आहेत. आरोपीचा सीसीटीव्हीच्या मदतीने शोध घेतला जात आहे.
--------------