उसतोड कामगार पुरवण्याच्या नावाखाली अनेकांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 04:02 AM2021-07-13T04:02:23+5:302021-07-13T04:02:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भिगवण : ऊस तोडणीसाठी कामगार देतो म्हणून अनेकांना गंडा घालणाऱ्या टोळी मालकाच्या (मुकादम ) विरोधात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भिगवण : ऊस तोडणीसाठी कामगार देतो म्हणून अनेकांना गंडा घालणाऱ्या टोळी मालकाच्या (मुकादम ) विरोधात भिगवण पोलिसांत दोन ऊस वाहतूकदार ट्रॅक्टर मालकांकडून गुन्हा नोंद करण्यात आला. एकाच मुकादमाने भिगवण परिसरात अनेकांना गंडा घातल्याने आणखीन काही गुन्हे नोंद होणार असल्याची माहिती मिळत आहे.
या प्रकरणी सीताराम सोमा मोरे, दिलीप भाऊसाहेब सोनवणे, कमल सीताराम मोरे (सर्व रा. धाडणे, ता. साक्री, जि. धुळे) यांच्यावर भिगवण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी भास्कर बाबूराव काळे (रा. डिकसळ) यांनी फिर्याद दिली. काळे यांच्याकडून ३ लाख ५६ हजार व विश्वास रंगनाथ देवकाते (रा. मदनवाडी) यांच्याकडून २ लाख २५ हजार असे एकूण ५ लाख ८१ हजार एवढी रक्कम रोख स्वरूपात घेऊन ऊसतोडणी मजूर पुरविण्याची हमी दिली होती. मात्र, ऊसतोडणी मजूर न पुरवता विश्वासघात केला.
या प्रकरणाचा तपास भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली विनायक दडस पाटील हे पुढील तपास करीत आहेत.
कोट
फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी संपर्क साधावा
अशा प्रकारे भिगवण आणि परिसरातील अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाली असल्याची शक्यता आहे. संबंधितांनी तत्काळ संपर्क साधावा. त्यांना न्याय देण्याचा पोलीस प्रशासन सर्वोतपरी प्रयत्न करेल.
जीवन माने, प्रभारी अधिकारी, भिगवण पोलीस ठाणे.
चौकट
ऊसतोड मुकादमांच्याद्वारे फसवणूक हा ऊस उत्पादन क्षेत्रातील वाहतूकदारांचा महत्त्वाचा प्रश्न आहे. ऊसपट्ट्यातील शेतकरी वाहतूकदारांची अनेकदा फसवणूक होत असते, अशा चर्चा नेहमीच पुढे येत असतात. उस वाहतूकदार पुढे येत नाहीत. त्यामुळे कारखान्याकडून घेतलेली उचलस्वरूप रक्कम ऊस वाहतूकदारांना भरपाई करावी लागते. विशेषत: ऊस तोडणी हंगाम सुरु होण्याच्या काळात तोडणी कामगारांच्याकडून फसवणुकीचे प्रकार चर्चेला येत असतात.