बंगाली मातीचे सोने होण्याची बतावणी करुन ५० लाखाचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:10 AM2021-01-23T04:10:58+5:302021-01-23T04:10:58+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क पुणे : सराफी कुटुंबाशी जवळीकता वाढवून बंगाल येथील मातीचे सोने होते असे सांगून तब्बल ४९ लाख ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सराफी कुटुंबाशी जवळीकता वाढवून बंगाल येथील मातीचे सोने होते असे सांगून तब्बल ४९ लाख ९२ हजार रुपयांची रोख रक्कम व सोन्याचे दागिने घेऊन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी पवन ज्वेलर्सचे विपुल नंदलाल वर्मा (वय ३९, रा. हडपगाव) यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मुकेश चौधरी (रा. हरियाना) त्यांचे काका आणि एक महिला अशा तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. मागील एक वर्षापासून हा प्रकार सुरु होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्मा यांचा हडपसर गाव येथे पवन ज्वेलर्स नावाने सराफी दुकान आहे. आरोपी चौधरी हा मूळचा हरियाणा येथील राहणारा असून त्याचा गाई आणि दुग्ध पदार्थाचा व्यवसाय आहे. वर्मा यांची चौधरी याच्याशी अंगठी खरेदीच्या निमित्ताने ओळख झाली होती. यातूनच पुढे त्यांच्यात नंतर घरगुती संबंध निर्माण झाले. त्यांनी वर्मा यांना पनीर, तांदूळ धान्य देऊन अधिक विश्वास संपादन केला. फिर्यादी यांच्या वडिलांशी जवळीक साधून त्यांना आमच्याकडे बंगाल येथून आणलेली माती आहे, माती गरम केल्यानंतर त्याचे सोने होते सांगितले.
हातचलाखी करून त्यांनी माती गरम करून सोने काढून दाखवले. चौधरीने घरातील लग्न असल्याचे सांगत पैशाची मागणी फिर्यादी यांच्या कुटुंबियांना केली. त्या बदल्यात बंगालनमधून आणलेली ४ किलो माती त्यांना दिली. तिन्ही आरोपींनी माती दिल्यानंतर फिर्यादीकडून वेगवेगळ्या प्रकारचे सोन्याचे ४८ तोळे दागिने आणि ३० लाख रुपये घेतले. फिर्यादी यांनी माती गरम करून सोने करण्याचा प्रयत्न केला असता मातीचे सोने झालेच नाही. आपली फसवणूक झाल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक माने अधिक तपास करीत आहेत.