गंधर्व गायकीचे सूर आजही निनादतात...! : कीर्ती शिलेदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 08:13 PM2018-06-28T20:13:52+5:302018-06-28T20:18:16+5:30
बालगंधर्वांचे जादुई सूर पंजाबी, तेलुगू, बंगाली अशा विविध भाषांमध्ये : कीर्ती शिलेदार
पुणे : नटसम्राट बालगंधर्व यांनी मराठी रंगभूमीला सोन्याचे दिवस दाखवले. भाषाभेद, प्रांतभेद दूर सारुन त्यांनी नाटक सर्वदूर पोहोचवले. बालगंधर्वांचे जादुई सूर पंजाबी, तेलुगू, बंगाली अशा विविध भाषांमध्ये पोहोचले. संगीत रंगभूमीवर आजही गंधर्व गायकीचे सूर निनादतात, अशा शब्दांत नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार यांनी बालगंधर्व यांच्या ललितमधुर गायकीच्या आठवणींना उजाळा दिला.
महानगरपालिकेतर्फे यावर्षीचा ‘बालगंधर्व’ पुरस्कार आॅर्गनवादक चंद्रशेखर देशपांडे यांना प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानावरुन शिलेदार बोलत होत्या. यावेळी महापौर मुक्ता टिळक यांच्यासह नगरसेविका नीलीमा खाडे, माधुरी सहस्त्रबुध्दे, ज्योत्स्ना एकबोटे उपस्थित होत्या.
गायिका पोर्णिमा धुमाळे, नेपथ्यकार दत्ता गाडेकर, संगीत नाटक कलाकार राम साठ्ये, प्रकाश योजनाकार अनिल टाकळकर, पुरुषोत्तम करंडक स्पर्धेतील उत्कृष्ट दिग्दर्शक ऋषी मनोहर यांना यंदाचे बालगंधर्व विशेष पुरस्कार देण्यात आले.
शिलेदार म्हणाल्या, ‘बालगंधर्वांचे गायन ललित मधुर, जादुई होते. आजही संगीत नाटक म्हटल्यावर बालगंधर्व आठवतात, असा अव्दितीय लोकोत्तर बालगंधर्व पुरस्कार ज्येष्ठ आॅर्गनवादक चंद्रशेखर यांना मिळतो तेव्हा अतिशय योग्य व्यक्तीचे कौतुक झाले अशीच भावना होते. महानगरपालिकेकडून अशाच उत्तमोत्तम कलकारांचा गौैरव व्हावा, असे वाटते.’
चंद्रशेखर देशपांडे म्हणाले, ‘बालपणी बालगंधर्वांचा सहवास लाभला. वडील हरिभाऊ देशपांडे यांच्यामुळे संगीत रंगभूमीची सेवा करण्याची संधी मिळाली. नाट्यसंगीताचे विद्या दान ६५ वर्षे करता आले. बालगंधर्व गायकीच्या सेवेत आयुष्य वेचता आले याचे समाधान आहे. विद्यादानाचे काम अविरत सुरु ठेवणार आहे.’
महापौर मुक्ता टिळक यांनी स्वागत व प्रास्ताविक भाषण केले. ज्योत्स्ना एकबोटे यांनी सूत्रसंचालन, माधुरी सहस्त्रबुध्दे यांनी मानपत्राचे वाचन आणि नीलिमा खाडे यांनी आभार प्रदर्शन केले.