पुणे विमानतळावर काँग्रेसची गांधीगिरी; नवे टर्मिनल सुरू करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 07:35 PM2024-01-06T19:35:16+5:302024-01-06T19:35:45+5:30
१५ दिवसांत उद्घाटनाचा इशारा.
लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: विमानतळावरील नव्या टर्मिनलचे सर्व काम पूर्ण झाले आहे, मात्र उद्घाटनासाठी अपेक्षित बड्या नेत्याची तारीख मिळत नाही म्हणून उद्घाटन लांबणीवर टाकले जात आहे, असा आरोप करत त्याचा निषेध करून काँग्रेसच्या वतीने येत्या १५ दिवसात या टर्मिनलचे उद्घाटन करण्याचा इशारा देण्यात आला.
पुणे विमानतळ प्राधिकरणाच्या संचालकांची भेट घेऊन त्यांना गुलाबाची फुले भेट देऊन गांधीगिरी करण्यात आली. काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, दत्ता बहिरट, सुनील मलके, चेतन अग्रवाल, संकेत गलांडे युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे, रोहन सुरवसे यावेळी उपस्थित होते.
जोशी यांनी सांगितले की प्राधिकरणाच्या वतीने वारंवार हे नवे टर्मिनल सुरू करण्याच्या तारखा दिल्या जात आहेत. त्याचे सर्व काम पूर्ण झाले आहे. उद्घाटनासाठी त्यांना केंद्रीय स्तरावरची बडी व्यक्ती हवी आहे, मात्र त्यांची वेळ मिळत नाही. त्यामुळे उद्घाटन लांबणीवर टाकले जात आहे. याचा प्रवाशांना त्रास होत असल्याचे जोशी यांनी सांगितले.
विमानतळावरच्या सर्व सुविधा मिळणे हा प्रवाशांचा हक्क आहे. प्राधिकरणाच्या या धोरणामुळेच तोच नाकारला जात आहे. पुणेकर हे कधीही सहन करणार नाही असे आमदार धंगेकर म्हणाले. प्रथमेश आबनावे यांनी यांनी सांगितले की, आम्ही १ जानेवारीला हे टर्मिनल सुरू करावे अशी मागणी प्राधिकरणाकडे मेल करून केली होती. मात्र त्याची दखलच घेतली गेली नाही. काम पूर्ण झाल्यानंतरही एखादी व्यवस्था सुरूच न करणे हा प्रवाशांवर अन्यायच असल्याचे आबनवे म्हणाले. येत्या १५ दिवसात नवे टर्मिनल सुरू केले नाही तर काँग्रेसच्या वतीने त्याचे रितसर उद्घाटन करून ते सुरू केले जाईल असा इशाराच यावेळी प्राधिकरणाला देण्यात आला.