संकुचित विचारसरणीच्या कोंडवाड्याविरोधात एल्गार, गणेश देवी यांचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 05:16 AM2019-09-30T05:16:23+5:302019-09-30T05:16:49+5:30
संकुचित विचारसरणीचे पिंजरे आणि कोंडवाड्यातून बाहेर पडणारा समाज निर्माण व्हावा, यासाठी ज्येष्ठ विचारवंत आणि भाषा अभ्यासक डॉ. गणेश देवी यांनी पुढाकार घेतला आहे.
पुणे : संकुचित विचारसरणीचे पिंजरे आणि कोंडवाड्यातून बाहेर पडणारा समाज निर्माण व्हावा, यासाठी ज्येष्ठ विचारवंत आणि भाषा अभ्यासक डॉ. गणेश देवी यांनी पुढाकार घेतला आहे. जाती-धर्माच्या भिंती दूर सारुन जे विवाहास तयार असणाऱ्या तरूण-तरुपींना संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. २ ते १० आॅक्टोबर दरम्यान किमान १०० तरुणांचा प्रतिसाद न मिळाल्यास उपोषण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
‘लोकमत’शी बोलताना डॉ. गणेश देवी म्हणाले, ‘आंतरधर्मीय, आंतरजातीय विवाहांना होणारा विरोध, त्यातून होणारे आॅनर किलिंगसारखे प्रकार अशा घटनांनी समाज ढवळून निघाला आहे. लग्नाचा निर्णय घेताना जे तरुण जात, धर्माचा विचार करणार नाहीत, त्यांनी २ ते १० आॅक्टोबर दरम्यान माझ्याशी संपर्क साधावा. दररोज किमान नऊ-दहा तरुण-तरुणींचा प्रतिसाद मिळेल, अशी आशा आहे. तसा प्रतिसाद न मिळाल्यास मी त्या दिवशी फक्त पाणी पिऊन उपोषण करेन.
तरुण-तरुणींनी माहिती पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या अनोख्या अभियानाला साहित्य, कला, सामाजिक
अशा विविध क्षेत्रांतून उदंड प्रतिसाद मिळत आहे. वसंत आबाजी डहाके, प्रज्ञा दया पवार, विद्या बाळ, प्रभा गणोरकर, नीरजा, डॉ. हमीद दाभोलकर, अंजली मायदेव, अन्वर राजन, सुभाष वारे, सुनिती सु. र., गीताली वि. म., उल्का महाजन, महावीर जोंधळे, धनाजी गुरव, संभाजी भगत अशा अनेक मान्यवरांनी पाठिंबा दिला आहे.