Ganesh Festival: गणेश मंडळांचा नेमका खर्च होतो किती? मिरवणुकीवर सर्वाधिक खर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 04:03 PM2023-09-30T16:03:42+5:302023-09-30T16:03:49+5:30
अनेक मंडळांचा मुख्य मिरवणूक स्पीकर व लाइटवर लाखो रुपये खर्च होतात...
पुणे : गणेश प्राणप्रतिष्ठा मिरवणूक आणि विसर्जन मिरवणुकीतील डीजेच्या दणदणाटाने नागरिक त्रस्त होतात. या आवाजामागचे नेमके कारण गणेश मंडळांकडून होणाऱ्या खर्चावरून लक्षात येते. काही मंडळांच्या अहवालाचा अभ्यास केल्यास ज्यासाठी गणेश उत्सव साजरा केला जातो, त्यासाठी कमीतकमी खर्च होतो, तर मिरवणुकीवर सर्वाधिक खर्च होत असल्याचे दिसून आले आहे.
अनेक मंडळांचा मुख्य मिरवणूक स्पीकर व लाइटवर सुमारे दोन लाख रुपये खर्च होतात. जनरेटर, डिझेल यासाठी ७० ते ७५ हजार रुपये लागतात. ट्रॅक्टर भाड्यासाठी २५ ते ३० हजार रुपये मोजावे लागतात. याशिवाय ढोल पथकाला ५० ते ६० हजार रुपये द्यावे लागतात. असे एकूण साडेतीन लाख रुपये खर्च होतात.
दुसरीकडे, दहा दिवसांच्या पूजेसाठी हारफुले, प्रसाद, साहित्य यांवर ११ हजार रुपये, मूर्ती पेटिंग, दागिने पॉलिश यावर साधारण १० हजार रुपये खर्च केले जातात. त्याखालोखाल गणेश जन्माच्या उत्सवाला खर्च केला जातो. २६ जानेवारी, १५ ऑगस्टसारख्या महत्त्वाच्या दिवसाला अगदीच किरकोळ रक्कम खर्च होते. हे पाहता इतका खर्च करून उभारलेल्या डोलाऱ्याचा खर्च वसूल करण्यासाठी लोकांना भंडावून सोडले जाते की काय, असे वाटते.