गणेशोत्सवाची ३०० वर्षांची परंपरा : भोर शहरातील फडणीस वाडा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2019 12:45 PM2019-09-07T12:45:19+5:302019-09-07T12:47:22+5:30
फडणीस यांच्या वाड्यात सागवानी लाकडाचा शिवकालीन देव्हारा आहे.
पुणे : सुमारे ३०० वर्षांची परंपरा असलेला भोर शहरातील शिवापुरी आळीतील फडणीसवाड्यातील शिवकालीन काळापासून सुरू असलेल्या गणेशजन्म सोहळ्याची परंपरा फडणीसांच्या १८ व्या पिढीत पारंपरिक पद्धतीने आजही सुरू आहे. राज्यातील ग्रामीण भागातील पारंपरिक पद्धतीने सोहळ्याचा वापर करून गणेश जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे. हा सोहळा पाहण्यासाठी शहरातील नागरिक येत आहेत.
छत्रपती शिवाजीमहाराजांच्या काळापासून ३०० पूर्वी व्यंकोजी फडणीस व चिंतामणी फडणीस यांनी भाद्रपद शु. प्रतिपदा ते भाद्रपद शु. पंचमीदरम्यान ५ दिवस अष्टविनायक गणपती उत्सवाप्रमाणे हा उत्सव साजरा केला जात आहे. गणपती प्राणप्रतिष्ठापनेच्या दिवशी फडणीस अरुणकाका जोशी यांच्या घरून गणेशमूर्ती सजवलेल्या पालखीतून वाजतगाजत फडणीसवाड्यात आणून प्रतिष्ठापना करण्यात आली. गणपतीला दररोज एक हजार दुर्वा वाहिल्या जातात. दुपारी ११ ते १२.३० दरम्यान जन्मकाळाचे कीर्तन व नंतर गणेशाला पाळण्यात ठेवून पाळण्याची दोरी ओढून गणेशजन्म सोहळा साजरा करण्यात आला. यानंतर गणेश पुराणवाचन, नारायण काणेबुवा यांचे कीर्तन, प्रवचन झाले. रात्री धूपारती व हरिकीर्तनाचा कार्यक्रम झाला.
फडणीस यांच्या वाड्यात सागवानी लाकडाचा शिवकालीन देव्हारा आहे. त्यात यमाईदेवीची लाकडी मूर्ती असून गणपतीची एक मूर्ती पितळी व एक तांब्याची आहे. गणेश प्राणप्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या दिवशी लळिताचे कीर्तन असून त्याचा प्रसाद रात्री दिला जातो. अशा पद्धतीने गणेश जन्मोत्सव संपूर्ण राज्यात भोर येथील फडणीसवाड्यात फडणीस व शनिवारवाड्यात पेशवे आणि मुजुमदारवाड्यात मुजुमदार मागील ३०० वर्षांपासून अखंडपणे साजरे केले जात असल्याचे प्रमोद फडणीस यांनी सांगितले.
......
भोरचे राजे पंतसचिव पूर्वी आंबवडे गावात व फडणीस चिखलावडे गावात राहत होते. पंतसचिवांबरोबर फडणीसही भोरला राहायला आले. मात्र चिखलावडे गावात आजही त्यांचे गणेश मंदिर आहे.
भोर येथील फडणीसवाड्यातील गणेश जन्मोत्सवाला वेल्हे कोषागारातून २७ रुपयांच अनुदान मिळत होते. रोषणाईचे साहित्य भोरचे राजे पतंसचिव देत असत. पंतसचिव सर्व लवाजम्यासह गणेशजन्मकाळाच्या कीर्तनाला स्वत: हजेरी लावत असत.
मात्र, संस्थाने खालसा झाली आणि पुढे ही परंपरा बंद झाली असली तरी मागील ३०० वर्षे अखंडपणे फडणीसवाड्यात व्यंकटेश रामचंद्र फडणीस, त्यांचे पुतणे प्रमोद फडणीस ही दोन कुटुंबे सर्व खर्च करून आपली परंपरा आजही कायम जपत आहेत.