डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटीलला पराभूत करत गणेश जगताप ठरला जायंट किलर...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 01:22 PM2017-12-22T13:22:44+5:302017-12-22T13:29:56+5:30
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अवघ्या मिनिटाच्या आत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील याला चीतपट करीत गणेश जगतापने शुक्रवारचा दिवस गाजविला.
पुणे : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अवघ्या मिनिटाच्या आत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील याला चीतपट करीत गणेश जगतापने शुक्रवारचा दिवस गाजविला. दुसऱ्या अन्य लढतीत जखमी झाल्याने शिवराज राक्षे याला माघार घ्यावी लागली. त्यामुळे अभिजित कटके याला विजयी घोषित करण्यात आले.
भूगाव येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत चंद्रहार पाटील आणि गणेश जगताप यांच्यातील मिनिटभराची लढत चांगलीच गाजली. पाटील याने डावाच्या सुरुवातीला खेमे डाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा डाव त्याने चपळाईने उलटवित काही कळायच्या आतच पाटील याला चीतपट केले. त्यावेळी दोघांच्याही खात्यात शून्य गुण होते.
कुस्ती झटपट निकाली लागल्याने, चांगला खेळ पाहण्यासाठी आलेल्या कुस्ती प्रेमींची काहीशी निराशा झाली. मात्र, गणेशने तुलनेने अनुभवी असलेल्या कसदार मल्लाविरोधात दाखविलेली चपळाई चर्चेचा विषय झाली. चंद्रहार पाटील याने या पूर्वी २००७ आणि २००८ साली महाराष्ट्र केसरी किताबावर मोहोर उमटविली होती. यंदाच्या स्पर्धेत देखील विजेतेपदाचा दावेदार म्हणून त्याच्याकडे पाहिले जात होते. पाटील याला नमवित जगताप जायंट किलर ठरला.
दुसऱ्या लढतीत अभिजित कटके याने शिवराज राक्षे याला पराभूत केले. कटकेने सुरुवातीपासूनच अक्रमक खेळ करीत आपले इरादे स्पष्ट केले. त्याने दुहेरी पट काढत त्याच्यावर ताबा मिळविला. त्यानंतर भारंदाज डावावर ७ गुणांची अघाडी घेतली. मात्र खेळताना राक्षेच्या पायाच्या लिगामेंटला दुखापत झाली. त्यानंतर त्याने माघार घेतल्याने कटके याला विजयी घोषित करण्यात आले.
शुक्रवारी (आज) सायंकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास अभिजित कटके आणि गणेश जगताप यांच्यात लढत होईल. कटके देखील विजयाचा दावेदार मानला जात असल्याने, या लढतीकडे कुस्तीप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे.