गणेश जयंती : मयूरेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 12:17 AM2019-02-09T00:17:08+5:302019-02-09T00:17:38+5:30

तीर्थक्षेत्र मोरगाव (ता. बारामती) येथे आज गणेश जयंतीनिमित्त पहाटे चारपासून मयूरेश्वर दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या.

Ganesh Jayanti: The devotees queue for the visit of Mayureshwar | गणेश जयंती : मयूरेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा

गणेश जयंती : मयूरेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा

Next

मोरगाव - तीर्थक्षेत्र मोरगाव (ता. बारामती) येथे आज गणेश जयंतीनिमित्त पहाटे चारपासून मयूरेश्वर दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. मुक्तद्वार दर्शनाच्या निमित्ताने राज्यभरातील भाविकांनी स्वहस्ते जलस्नान व अभिषेक-पूजा केल्या. रात्री उशिरापर्यंत ५० हजारांहून अधिक भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

आज (दि. ८) गणेश जयंतीनिमित्त पहाटे गुरव मंडळीची प्रक्षाळ पूजा झाली. यानंतर मयूरेश्वराचा मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला. गणेश जयंतीच्या निमित्ताने पुणे, सातारा, पनवेल, ठाणे, सोलापूर, सातारा आदी राज्यभरातील भाविकांनी ‘श्रीं’च्या दर्शनासाठी गर्दी केली होती.

काल (दि. ७) रात्री ७ वाजता महासाधू मोरया गोसावीप्राप्त मंगलमूर्ती पालखी सोहळ्याचे चिंचवड येथून मोरगावला रात्री ७ वाजता आगमन झाले. पालखीचे स्वागत विश्वस्त विनोद पवार, राजेंद्र उमाप, विश्राम देव, सरपंच नीलेश केदारी व दत्तात्रय ढोलेंसह ग्रामस्थांनी केले. पालखी स्वागताच्या निमित्ताने गावात घरोघरी रांगोळी व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती. आज द्वारयात्रेचा शेवटचा दिवस असल्याने भाविकांनी गर्दी केली होती. आज द्वारयात्रेचा शेवटचा टप्पा उत्साहात संपन्न झाला.

दुपारी १२ वाजेपर्यंत मुक्तद्वार दर्शन सुरू होते. यानंतर मुख्य विश्वस्त मंदार देव यांच्या हस्ते मयूरेश्वराची पूजा झाली. आज होणारी गर्दी लक्षात घेता, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या वतीने सहायक पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दिवसभर गर्दीचा ओघ सुरूच होता. रात्री सर्व नियोजित कार्यक्रम संपन्न झाले.


माघी गणेश जयंती उत्साहात

वडगाव निंबाळकर : बारामती तालुक्यातील कोºहाळे बुद्रुक, वडगाव निंबाळकर, परिसरात माघी गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने गणेश मंदिरामध्ये जन्म सोहळा, प्रवचन, भजन, कीर्तन आदी धार्मिक तसेच सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कोºहाळे बुद्रुक येथील स्वामी समर्थ तरूण मंडळाच्या वतीने सिद्धिविनायक गणेश मंदिरात गणेश जयंती सोहळा मोठ्या उत्साहाने भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.

गुरूवारी (दि. ७) श्रीं ची पालखीतून पारंपरिक पध्दतीने मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतिश खोमणे, फलटण तालुका दुध संघाचे अध्यक्ष धनंजय पवार, पंचायत समिती सदस्य प्रदीप धापटे, सहायक पोलीस निरीक्षक समाधान चवरे, दत्तात्रय गावडे, संतोष दोशी, सचिन दोशी, प्रकाश गावडे, राकेश दोशी आदींसह गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शुक्रवारी (दि. ८) सकाळी मूर्तीस अभिषेक, पूजा, आरती आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले. सकाळपासूनच भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती. दुपारी १२ वाजता जन्मोत्सव सोहळा झाल्यावर भाविकांतर्फे पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर महिलांनी पाळणा गायला. दुपारी १२ वाजता मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आरती करण्यात आली. यानिमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

Web Title: Ganesh Jayanti: The devotees queue for the visit of Mayureshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे