गणेश जयंती होणार साधेपणाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:11 AM2021-02-14T04:11:22+5:302021-02-14T04:11:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : नवीन वर्षात सुरुवातीला भक्तिभावाने साजरा केला जाणारा सार्वजनिक सण म्हणजेच गणेशजन्म सोहळा होय. कोरोनाच्या ...

Ganesh Jayanti will be simple | गणेश जयंती होणार साधेपणाने

गणेश जयंती होणार साधेपणाने

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : नवीन वर्षात सुरुवातीला भक्तिभावाने साजरा केला जाणारा सार्वजनिक सण म्हणजेच गणेशजन्म सोहळा होय. कोरोनाच्या संचारबंदीत अनेक सण आणि उत्सवावर बंधने आली. सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. परंतु वर्षातील पहिला सार्वजनिक सण म्हणून साजरा केला जाणारा गणेशजन्म सोहळा यंदा साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय पुण्यातील गणेश मंदिरे आणि मंडळांनी घेतला आहे.

शहरात कसबा गणपती मंदिर, पेशवेकालीन शनिवारवाडा गणेश मंदिर, कसबा पेठेतील गुंडाचा गणपती, सोमवार पेठेतील त्रिशुंड मयुरेश्वर गणपती, सिंहगड रस्त्यावरील विघ्नहर्ता गणेश, चतु:शृंगी टेकडीजवळ पार्वतीनंदन गणेश, शनिवार पेठेतील वरद गणपती, केळकर रस्त्यावरील माती गणपती, कर्वे रस्त्यावरील दशभुजा गणपती अशी अनेक जुन्या काळातील मंदिरे आहेत. तर हजारोंच्या संख्येत गणेश मंडळे आहेत.

दरवर्षी अशा सर्वच ठिकाणी गणेशजन्म सोहळ्याच्या एक आठवडा अगोदर सांस्कृतिक कार्यक्रम, भजन, कीर्तने, स्पर्धा, पालखी मिरवणूक यांना सुरुवात होते. यंदा मात्र एक दिवसाचा धार्मिक विधी, होमहवन, अभिषेक हे कार्यक्रम होणार आहेत. याव्यतिरिक्त इतर कार्यक्रम होणार नाहीत. तसेच मंडळांकडून मिरवणूक आणि महाप्रसादही रद्द करण्यात आले आहेत. भाविकांनी लाडू वाटप, द्रोणमध्ये प्रसाद वाटप करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने काही गणेश कार्यकर्त्यांशी साधलेला संवाद.

चौकट

देवदेवेश्वर संस्थानचे विश्वस्त उदयसिंह पेशवा म्हणाले, “सारसबागेतील तळ्यातील गणपती पुणेकरांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी उत्सवाचे नियोजन केले जाते. यंदा आर्थिक अडचणींमुळे उत्सव साधेपणाने होईल. दोन दिवसांपासून होमहवन सुरू आहेत. गणेशजन्माच्या दिवशी सर्व प्रकारचे अभिषेक आणि धार्मिक विधी होणार आहेत. भजन, कीर्तने व इतर सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाहीत.”

चौकट

“महामारीची सर्व काळजी घेऊन आणि नियम पाळून गणेशजन्म सोहळा साजरा होणार आहे. गणेश जन्म सोहळ्याच्या दिवशी पहाटे ४ वाजल्यापासून स्वराभिषेक, प्रातःकालीन आरती, गणेश याग, सहस्त्रावर्तने, श्रींची महामंगल आरती, श्री गणेश जागर असे कार्यक्रम साधेपणाने होतील. यंदा मिरवणूक आणि महाप्रसाद रद्द केला आहे,” असे श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी सांगितले.

चौकट

“दरवर्षी कीर्तन, भजन याबरोबरच मोठ्या प्रमाणावर प्रसाद वाटप केले जाते. पाळण्यात गणेशजन्म सोहळा साजरा केला जातो. यंदा भाविकांना दर्शनासाठी परवानगी देण्यात येईल. मंदिरे खुली होण्यास परवानगी मिळाली तरी सर्व संथ गतीने चालू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा करणे योग्य वाटत नाही.”

-मनीषा बोडस, विश्वस्त, विघ्नहर्ता गणेश मंदिर, सिंहगड रस्ता

चौकट

“पुण्याची ग्रामदेवता कसबा गणपती ही स्वयंभू मूर्ती आहे. पूर्वीपासून मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा होत नाही. पण कीर्तन, भजन होते. ती यंदा होणार नाहीत. मंदिराच्या गाभाऱ्यात सजावट आणि मूर्तीला पोशाख घालण्यात येईल. सोहळा साधेपणाने होईल.”

-विनायक ठकार, विश्वस्त, कसबा गणपती मंदिर

चौकट

“शनिवार पेठ पोलीस चौकीजवळ वरद गणपतीचे मंदिर आहे. वरद गणपती मंदिराची उभारणी १८९२ साली झाली. नवीन वर्षात १३० व्या वर्षात पदार्पण करत आहे. श्रींच्या दर्शनाला भाविकांची संख्या कमी असते. आम्ही धार्मिक विधी करतच असतो. दरवर्षी साधेपणानेच सोहळा साजरा केला जातो. जुने मंदिर असल्याने श्रींच्या दर्शनाला भाविकांनी यावे असे आम्हाला वाटते.”

-स्वानंद दीक्षित, विश्वस्त, वरद गणपती मंदिर

चौकट

“यंदाच्या वर्षी गणेश जन्म सोहळा साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. गणेश याग श्रींची आरती केली जाईल. महाप्रसाद रद्द करून अंध मुलांच्या शाळेत अन्नदान केले जाणार आहे.”

-प्रवीण परदेशी, मानाचा तिसरा गणपती, गुरुजी तालीम मंडळ

Web Title: Ganesh Jayanti will be simple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.