आमच्याही बाप्पाला पाहू द्या ना, मिरवणुकीचा विलंब टाळा
By अतुल चिंचली | Published: July 29, 2022 02:19 PM2022-07-29T14:19:08+5:302022-07-29T14:20:02+5:30
लक्ष्मी रस्त्यावरून जाणाऱ्या गणेश मंडळांची मागणी....
पुणे : आमच्या बाप्पालाही नागरिकांनी पाहावे अशी आमची इच्छा असते. प्रतिष्ठित मंडळांप्रमाणे आमच्या मंडळाच्या बाप्पांचे विसर्जन थाटात व्हावे, असे वाटते. परंतु विसर्जन मिरवणुकीला होणाऱ्या विलंबामुळे कार्यकर्त्यांमधील उत्साह निघून जातो. अनंत चतुर्दशीला आम्हाला सहा ते सात तास एकाच जागी ताटकळत उभे राहावे लागते. विसर्जनाला विलंब न होता वेळेत बाप्पाला निरोप देता येईल, असे नियोजन करायला हवे, अशी मागणी लक्ष्मी रस्त्यावरून जाणाऱ्या गणेश मंडळांनी केली आहे.
विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी, टिळक, कुमठेकर आणि केळकर रस्त्यावरून मंडळे थाटात बाप्पाला निरोप देतात. अनंत चतुर्दशीला मानाचा पहिला श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सकाळी दहा वाजता टिळक पुतळ्याजवळ आगमन होते. त्यानंतर पुण्यातील मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते. मानाचे गणपती, महोत्सवी वर्षात पदार्पण केलेली मंडळे लक्ष्मी रस्त्यावरील समाधान चौकातून मार्गस्थ झाल्यावर पुढील मंडळांना क्रमांकानुसार सोडले जाते. सकाळी मिरवणूक सुरू झाल्यावर सायंकाळी ५ वाजेपर्यंत फक्त मानाचे पाच गणपती समाधान चौकातून जातात. त्यानंतर पुढच्या सात ते आठ तासात १५० ते २०० च्या आसपास मंडळे समाधान चौकातून जातात. त्या दोनशे मंडळांनी पुढील सात तासच मिरवणुकीचा आनंद कसा घ्यायचा, असा सवाल मंडळांनी उपस्थित केला आहे.
मानाच्या गणपती मंडळांनी दुपारी १२ च्या आत समाधान चौक पास करायला हवा. म्हणजे लक्ष्मी रस्त्यावरील लाईन लवकर सुरू होईल. तसेच इतर मंडळांचे गणपती, देखावेसुद्धा नागरिक पाहू शकतील आणि वेळेत मंडळांचे विसर्जन होईल.
- राकेश डाखवे, जनार्दन पवळे संघ
मानाच्या गणपतींचा थाट खूपच असतो. त्यांच्या मिरवणुकीत दोन-तीन ढोल पथके, लेझीम असतात. ते प्रत्येक जण समाधान चौकात येऊन आपला खेळ दाखवतात. त्यामुळे पाचही गणपती समाधान चौकातून पुढे मार्गस्थ होण्यास वेळ जातो. त्याचा परिणाम पूर्ण विसर्जन मिरवणुकीवर होतो.
- भाऊ करपे, सहकार तरुण मंडळ
आमची मिरवणूक सायंकाळी सुरू होते. पण लक्ष्मी रस्त्यावर आलो की आम्हाला तासनतास ताटकळत थांबावे लागते. त्यातून रात्री १२ नंतर स्पीकर बंद करावे लागतात. पण रात्रीचे १२ वाजून गेले तरी आमचे मंडळ समाधान चौकात येत नाही. त्यानंतर आम्हाला शांततेत गणपतीला अलका चौकापर्यंत घेऊन जावे लागते.
- विलास ढमाले, गणेशपेठ पांगुळ अळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
२०१९ मध्ये लक्ष्मी रस्त्यावर आमच्या रथाचा नंबर १५० होता. मिरवणूक सुरू झाल्यावर आमचे मंडळ एकाच जागी ८ तास थांबले होते. पुढे जाण्याचा प्रयत्न केला तरी जाता येत नव्हते. आम्ही समाधान चौक पास केल्यावर १५ मिनिटात अलका चौकात पोहोचलो. कार्यकर्तेही कंटाळून निघून गेले होते. जर आम्हाला सकाळी ८ वाजता विसर्जनाची परवानगी दिली. तर आम्ही स्वखुशीने सकाळी मिरवणूक काढू
- प्रीतम शिंदे, हिंद माता तरुण मंडळ
विसर्जन मिरवणुकीचा उत्साह आम्हाला घेता येत नाही. सायंकाळी ७ ला निघालेली मिरवणूक रात्री १२ पर्यंत समाधान चौकात येत नाही. एकाच ठिकाणी ताटकळत राहिल्यास कार्यकर्तेही घरी निघून जातात. सगळ्या मंडळांना विचारात घेऊन विसर्जन मिरवणुकीचे योग्य ते नियोजन करावे, अशी आमच्यासारख्या मंडळांची मागणी आहे.
- सागर शेलार, अशोक तरुण मंडळ