Ganesh Mahotsav: मानाच्या गणपतींमुळे वेळेची अडवणूक नको, उच्च न्यायालयात याचिका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 08:11 AM2022-08-30T08:11:16+5:302022-08-30T08:14:46+5:30
Ganesh Mahotsav: पुण्याच्या पाच मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीआधी अन्य सार्वजनिक मंडळांना गणपती विसर्जनासाठी लक्ष्मी रोड वापरण्याची मुभा देण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
मुंबई : पुण्याच्या पाच मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीआधी अन्य सार्वजनिक मंडळांना गणपती विसर्जनासाठी लक्ष्मी रोड वापरण्याची मुभा देण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
पुण्यातील पाच मानाचे आणि त्यानंतर दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जनासाठी निघाल्यानंतरच अन्य सार्वजनिक गणेश मंडळांचे गणपती विसर्जनासाठी निघतात. विसर्जन मिरवणूक पुण्याच्या लक्ष्मी रोडवरून निघते. मानाच्या पहिल्या गणपतीचे विसर्जन संध्याकाळी साडेसात वाजता होते. शेवटच्या मानाच्या गणपतीचे विसर्जन रात्री ११ वाजता होते. त्यामुळे अन्य सार्वजनिक मंडळांचा खोळंबा होतो, असे पुणे बधाई समाज ट्रस्टचे अध्यक्ष शैलेश बधाई यांनी याचिकेत म्हटले आहे. बधाई यांनी ही याचिका ॲड. अजिंक्य उडाणे यांच्याद्वारे उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
याचिकेनुसार, बधाई यांनी पुण्याच्या पाच मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीआधी अन्य मंडळांच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक लक्ष्मी रोडवरून काढण्याची परवानगी मिळविण्याकरिता पोलिसांकडे अर्ज केला. मात्र, पोलिसांनी त्यास तोंडी नकार दिला.
...असा कायदा नाही
पाच मानाचे गणपती आणि सहावा दगडूशेठ हलवाईच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक निघाल्याशिवाय अन्य सार्वजनिक मंडळांच्या गणपतींना विसर्जन मिरवणुकीसाठी लक्ष्मी रोड वापरू दिला जात नाही. आधी पाच मानाचे गणपती आणि दगडूशेठ हलवाईचा गणपती निघाल्यानंतरच अन्य सार्वजनिक गणपतींचे विसर्जन करावे, असा कायदा कुठेही अस्तित्वात नाही. तरीही असा भेदभाव केला जातो, असा आरोप याचिकेद्वारे करण्यात आला आहे. अन्य छोट्या मंडळांच्या गणपतींना मानाच्या गणपतींच्या आधी निघण्यापासून अडविण्यात येते, असे याचिकेत म्हटले आहे.