गणेश मंडळाचा कार्यकर्ता ते पुणे महापालिका स्थायी समिती अध्यक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 11:00 PM2019-12-13T23:00:00+5:302019-12-13T23:00:07+5:30
मंडई परिसरातील भाड्याच्या ८ बाय १० च्या पत्र्याच्या खोलीत आयुष्याची सुरूवात..
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा एक उत्साही गणेशभक्त कार्यकर्ता म्हणून नावलौकिक असलेल्या, हेमंत रासने यांची आज स्थायी समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली़.
गरीब कुटुंबात जन्माला आलेले व मंडई परिसरातील भाड्याच्या ८ बाय १० च्या पत्र्याच्या खोलीत आयुष्याची सुरूवात करणाऱ्या रासने यांनी, महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच १९८६ साली विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी म्हणून कामास प्रारंभ केला़. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेतून मिळालेली शिस्त 'संघटन मै शक्ती है' या सुत्रांतून शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक आशा सर्वच उपक्रमांतून मित्रमंडळींना सोबत घेऊन ते आजपर्यंत कार्यरत राहिले़.
सुवर्णयुग बँकेत कार्यरत असताना लेखनिक हुद्यावरून सुरवात करत रासने यांनी ७ वर्षे संचालक म्हणून तर २ वर्षे अध्यक्ष म्हणून काम केले. सन २००२ मध्ये भारतीय जनता पक्षाने त्यांना स्वीकृत नगरसेवकपदी काम करण्याची संधी दिली. तर २०१२ आणि २०१७ साली पालिकेकरिता उमेदवारीही दिली. २०१७ च्या निवडणुकीत पुणे शहरात पुरूष नगरसेवकांमध्ये शहरात सर्वात जास्त मते मिळविण्याचा बहुमान रासने यांना मिळाला. या दरम्यान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने त्यांची सन २़०१४ साली विश्वस्तपदी निवड केली.
पुणे महापालिकेत प्रतिनिधित्व करीत असताना प्रामुख्याने दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरास जागा उपलब्ध करून देणे, पुण्याचा मानबिंदू असलेल्या शनिवारवाड्याचे सुशोभीकरण व तो मूळ स्वरूपात ७ मजली पुनर्बांधणी करावा यासाठी पुरातत्व विभागाशी पाठपुरावा करणे, २०५ फुटी राष्ट्रीय ध्वज उभारणे, ऐतिहासिक नानावडाचे सुशोभीकरण करणे तसेच शहरातील वाहनचालकांचे कडक उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून मध्यवर्ती भागातील ७ सिग्नलवर एकूण २० ठिकाणी ग्रीन नेट असे उल्लेखनीय कार्य त्यांनी केले आहे़ तसेच शहराच्या मध्यवर्ती भागातील पथारीवाल्याचे प्रश्न, जुन्या वाड्यांचा प्रश्न, कचरा नियोजन आदी समस्यांच्या सोडवणुकीसाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे़
सर्वसामान्य गणेशोत्सव कार्यकर्ता आज पुणे महापालिका स्थायी समिती अध्यक्ष होतोय, याचा पुणे शहरातील प्रत्येक गणपती मंडळ कार्यकर्त्यांला अभिमान असल्याचा भावना त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत़