गणेश मंडळांना सवलतीचा वीजदर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 11:20 PM2018-08-24T23:20:15+5:302018-08-24T23:20:40+5:30
धार्मिक उत्सवांसाठी अधिकृतच वीजपुरवठा घ्यावा आणि त्यायोगे सार्वजनिक सुरक्षेला महत्त्व द्यावे, यासाठी तात्पुरत्या वीजदर कमी ठेवण्यात आला आहे.
बारामती : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सवलतीच्या व वहन आकारासह ४ रुपये ३८ पैसे प्रतियुनिट या वीजदराने तात्पुरती व अधिकृत वीजजोडणी घ्यावी; तसेच गणेशोत्सवासाठी वीजसुरक्षेबाबत गांभीर्याने उपाययोजना कराव्यात, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांच्या तात्पुरत्या वीजजोडणीसाठी प्रतियुनिट ३ रुपये २० पैसे अधिक १ रुपया १८ पैसे वहन (व्हिलींग) आकार तसेच इंधन अधिभार असे वीजदर आहेत. व्हिलींग चार्जेससह हा दर घरगुती वीजदरापेक्षा फक्त १३ पैशांनी अधिक आहे, तर वाणिज्यिक दरापेक्षा २ रुपये ९० पैसे प्रतियुनिटने कमी आहे. धार्मिक उत्सवांसाठी अधिकृतच वीजपुरवठा घ्यावा आणि त्यायोगे सार्वजनिक सुरक्षेला महत्त्व द्यावे, यासाठी तात्पुरत्या वीजदर कमी ठेवण्यात आला आहे.
मंडप किंवा रोषणाई, देखाव्यांसाठी लागणारी वीजयंत्रणा अधिकृत वीज कंत्राटदारांकडूनच करून घेण्यात यावी व अर्थिंगचीही खबरदारी घेण्यात यावी. वापरण्यात येणाऱ्या वायर वीजभारासाठी सक्षम नसल्यास शॉर्ट सर्किटचा धोका निर्माण होतो. पावसाळी दिवस असल्याने, मंडपासाठी टिनपत्र्यांचा वापर होत असल्याने वायर लूज किंवा अनेक ठिकाणी तुटलेल्या, पण टेपने जोडलेल्या असल्यास वीजपुरवठा खंडित होण्यासह अपघाताची भीती असते.
तातडीच्या मदतीची संभाव्य गरज पाहता मंडळाच्या पदाधिकाºयांनी, कार्यकर्त्यांनी २४ तास सुरू असणारे टोल फ्री क्रमांक १९१२, १८००१०२३४३५ किंवा १८००२३३३४३५ यांवर संपर्क साधावा. याशिवाय, संबंधित क्षेत्रातील महावितरणचे अभियंता यांचे मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवावेत. विजेच्या लघुदाब, उच्चदाब वाहिन्या आणि रोहित्रांचा गणेशोत्सवातील आणि मिरवणुकीतील देखाव्यांना स्पर्श होणार नाही, अशा सुरक्षित अंतरावर देखावे तयार करावेत.
गणेशोत्सवात वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे अत्यावश्यक आहे. वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरू केल्यास एकाच न्यूट्रलमूळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब वाहिनीत प्रवाहित होते आणि त्यातून जीवघेणे अपघात घडतात. त्यामुळे हजारो भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सार्वजनिक गणेश मंडळांनी वीजसुरक्षेबाबत उपाययोजनांमध्ये तडजोड करू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.