PMC: गणेश मंडळानी मुदतीत मंडप न काढल्यास पालिका देणार नोटीस
By राजू हिंगे | Published: October 3, 2023 01:34 PM2023-10-03T13:34:36+5:302023-10-03T13:35:38+5:30
ज्या गणेश मंडळांनी मुदतीत मंडप कमानी काढलेल्या नाहीत त्यांना नोटीस देण्याबाबतची कार्यवाही देखील सुरू करण्यात आलेली आहे....
पुणे :गणेशोत्सवानंतर विहित मुदतीत म्हणजे दोन दिवसाच्या आत मध्ये मांडव, कमानी, रनिंग मंडप न काढल्यामुळे २२ गणेशोत्सव मंडळाचे मंडप काढण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर शहरातील अनधिकृत फ्लेक्स, बोर्ड, बॅनर्स काढणे बाबतची कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे. येत्या काही दिवसात ही कारवाई तीव्र करून संपूर्ण शहर अतिक्रमण मुक्त करण्याबाबतची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. ज्या गणेश मंडळांनी मुदतीत मंडप कमानी काढलेल्या नाहीत त्यांना नोटीस देण्याबाबतची कार्यवाही देखील सुरू करण्यात आलेली आहे.
पुणे महापालिकेला `जी-२०’ परिषदेच्या तयारीसाठी राज्य सरकारने २०० कोटी रुपये दिले होते. त्यातील १३९ कोटी रुपये हे रस्त्यांच्या कामासाठी खर्च केले जाणार होते. यासाठी शहरातील महत्त्वाचे प्रमख १५ रस्ते निवडून तेथील खड्डे ९ ऑगस्टपूर्वी बुजविण्याचे आदेश दिले होते. पण ही कामे न झाल्याने पावसाळ्यानंतर करण्यात येणार होती. त्यानुसार शहरातील ९२ किलोमीटर लांबीचे प्रमुख १५ रस्ते खड्डे आणि अतिक्रमण मुक्त करण्यासाठी १० ऑक्टोबरपासून या रस्त्यांवर प्रत्यक्षात काम सुरु होणार आहे.
गणेशोत्सवानंतर आयुक्त विक्रम कुमार यांनी शहरातील रस्त्यांच्या स्थितीचा आढावा घेतला. गणेशोत्सव संपला असला तरीही रस्त्यावर अद्याप देखावे, मांडव असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी हे मांडव काढून घ्यावेत, मांडवासाठी घेण्यात आलेले खड्डे ७ ऑक्टोबरपर्यंत व्यवस्थित बुजवून रस्ता दुरुस्त करावा. अन्यथा जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. ‘मिशन १५’ मधील रस्त्यांची दुरुस्ती व इतर कामे १० ऑक्टोबपासून सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. जर या रस्त्यांवर १० ऑक्टोबरनंतर अतिक्रमण, अनधिकृत पथारी दिसल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.