गणेश मंडळांचा निर्धार : देखाव्यांचा खर्च केरळवासीयांसाठी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2018 01:55 AM2018-09-01T01:55:21+5:302018-09-01T01:55:47+5:30

गृहोपयोगी वस्तूंचे किट तयार; सोसायटीधारकही सहभागी

Ganesh Mandal's determination: Cost of scenes for the residents of Kerala | गणेश मंडळांचा निर्धार : देखाव्यांचा खर्च केरळवासीयांसाठी

गणेश मंडळांचा निर्धार : देखाव्यांचा खर्च केरळवासीयांसाठी

पुणे : पुरामुळे केरळमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. केरळवासीयांना पुन्हा संसार उभा करण्यासाठी आणि आधार देण्यासाठी सर्व स्तरांतून मदतीचा ओघ येत आहे. आता शहरातील नागरिक, सोसायट्या आणि गणेश मंडळांनीही त्यांना आर्थिक मदतीसोबतच संसारोपयोगी वस्तू देण्याचा निर्धार केला आहे. यासाठी वस्तूंचे किट तयार केले जात असून, ते मंडळाचे कार्यकर्ते तेथे नेऊन देणार आहेत.

काही तरुणांनी एकत्र येऊन लव्ह केअर शेअर फाउंडेशनतर्फे यापूर्वीच केरळसाठी मदत पाठविली आहे. त्यानंतर तेथे दोन स्वयंसेवकही गेलेले आहेत. तेथील सर्व परिस्थिती त्यांनी पाहिली असून, अजून मदत लागणार असल्याचे जाणवले. त्यामुळे आता मोठ्या प्रमाणावर केरळच्या मदतीसाठी गणेश मंडळेही येत आहेत. अष्टविनायक मित्र मंडळ ट्रस्ट आणि लव्ह केअर शेअर फाउंडेशनतर्फे अनेक गणेश मंडळांशी संपर्क साधला जात आहे. तसेच, सोसायटीधारकही मदतीसाठी पुढे आले आहेत. अनेक मंडळे त्यांचा देखाव्याचा खर्च आणि डीजेचा खर्च पूरग्रस्तांना देणार आहेत. तसेच विविध संस्थांनी या कामासाठी मदत द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या केरळमधील पाणी ओसरलेले आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना दैनंदिन गरजांसाठी अनेक वस्तू लागणार आहेत.
त्या वस्तूंची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये ब्रश, साबण, पीठ, तांदूळ, मसाला बॉक्स, किचन सेट, बेडशीट, टॉवेल आदी २७ वस्तूंचा समावेश आहे. तसेच, नागरिकांनी किंवा मंडळांनी खाद्यपदार्थ, औषधे, गृहोपयोगी वस्तू, कपडे अशा स्वरूपात मदत करावी, असे आवाहन केले आहे.

लव्ह केअर शेअर फाउंडेशनचे पीयूष शहा म्हणाले, ‘‘केरळमध्ये आम्ही यापूर्वी मदत पाठविली आहे. तसेच स्वयंसेवकही गेले आहेत.
तेथे जाऊन त्यांनी आम्हाला अजून मदत लागणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आम्ही गणेश मंडळे, सोसायटीधारकांना आवाहन करीत आहोत, की त्यांनी अधिकाधिक मदत करावी. अनेक मंडळे देखाव्याचा खर्च कमी करून मदत करण्यासाठी सरसावली आहेत.’’

दोनशे कुटुंबांकडे सामान पोहोचविणार
एर्नाकुलम येथील कुटुंबांना काहीच मदत मिळालेली नाही. त्या ठिकाणी मदत पाठविण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. तेथील सुमारे २०० कुटुंबांना गृहोपयोगी वस्तूंचे किट देण्यात येईल. एर्नाकुलम येथील चर्च अ‍ॅथॉरिटी आणि काही सामाजिक कार्यकर्ते आम्हाला मार्गदर्शन करीत आहेत, असेही पीयूष शहा यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
 

Web Title: Ganesh Mandal's determination: Cost of scenes for the residents of Kerala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.