Ganeshotsav 2022: पुण्यातील गणेश मंडळांची मेट्रोवर नाराजी; विसर्जन मिरवणुकीत अडथळा निर्माण होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 02:27 PM2022-08-09T14:27:04+5:302022-08-09T14:27:43+5:30
सर्व मंडळांना एकदम पाच वर्षांसाठी विनाशुल्क परवाने
पुणे : मेट्रो प्रकल्पाचे काम करताना शहराचा ऐतिहासिक वारसा, सांस्कृतिक जडण-घडण आणि गणेशोत्सव परंपरेचा विचार न करता मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. परिणामी, चुकीच्या कामांमुळे शहराचा सांस्कृतिक वारसा आणि वैभवशाली परंपरा असलेला गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीवर बंधने आली आहेत. त्यामुळे मेट्रोला वेळीच आवर घालावा आणि गणेशोत्सव वाचवावा, अशा शब्दांत गणेशोत्सव मंडळांनी महापालिकेच्या गणेशोत्सव नियोजन बैठकीत आपली नाराजी व्यक्त केली.
मेट्रोच्या कामामुळे मंडई, स्वारगेट परिसरातील मिरवणुकांना अडथळे निर्माण होणार असून अनेक मंडळांना मार्ग बदलावे लागणार आहेत. अनेक मंडळांना आता मिरवणूक रथ १५ ते १६ फुटाचेच करावे लागणार आहे. कर्वे रस्त्यावर मिरवणूक उड्डाणपुलावरून न्यायची की खालून हे पालिकेने आताच स्पष्ट करावे. पुलाखालून न्यायची झाल्यास मिरवणुकीसाठीचे रथ जास्तीत जास्त १३ फूट उंचीच उपलब्ध आहे, याकडे गणेश मंडळांच्या प्रतिनिधींनी लक्ष वेधले.
गणेशोत्सव काळात शिवाजी रस्त्यावर करण्यात येणारे बॅरिकेडिंग बंद करावे, रात्री बारापर्यंत स्पीकर वाजविण्यासाठी पाच दिवस परवानगी द्यावी, पार्किंगसाठी पुरेशी व्यवस्था, बॉक्स कमानी, जाहिरातींवर मर्यादा नको आदी मागण्या विविध गणेश मंडळांच्या प्रतिनिधींनी सोमवारी पालिका आयुक्तांकडे केल्या. विक्रमकुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र हडाळे, पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे, वाहतूक उपायुक्त राहुल श्रीरामे, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे व विलास कानडे, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त आशा राऊत यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
मानाच्या गणपतींप्रमाणे आम्हालाही मान द्या
पालिका व अन्य यंत्रणांतर्फे मानांच्या गणपतींना जसा मान दिला जातो, तसाच मान इतर मंडळांनाही दिला जावा, टिळक रस्त्यावरूनही मोठ्या संख्येने गणपती विसर्जन होते. त्यामुळे पालिकेने या रस्त्याकडेही लक्ष द्यावे, परवानगी देताना पोलिसांकडून २०० रुपये शुल्क आकारले जाते, ते बंद करावे, तसेच गणेशोत्सव कार्यकर्ते, बाहेरगावातून येणारे प्रेक्षक यांची सोय व्हावी, यासाठी रात्री हॉटेल, खाणावळी सुरू ठेवण्याची परवानगी देण्याची मागणीही करण्यात आली.
मिरवणुकीसाठीचे क्रमांक याबाबत योग्य नियोजन केले जाईल
बहुतांश मंडळांनी वर्गणी मागणे बंद केले आहे. स्वखुशीनेच काही व्यक्ती वर्गणी देतात. त्यामुळे जाहिराती व बॉक्स कमानी हेच मंडळांच्या उत्पन्नाचे साधन आहे. त्यावर पालिकेने बंधने घालू नयेत, अशी मागणी विविध कार्यकर्त्यांनी केली. गणेशोत्सव साजरा करताना सुरक्षेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. वादविवाद होणार नाही, यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. सुरक्षा तपासणी शक्य व्हावी, यासाठी बॉक्स कमानी उभारताना खालील भाग मोकळा ठेवावा. मेट्रोसंदर्भात मेट्रोच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल. पार्किंग, बॅरिकेडिंग, मिरवणुकीसाठीचे क्रमांक याबाबत योग्य नियोजन केले जाईल, असे अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे यांनी सांगितले.
सर्व मंडळांना एकदम पाच वर्षांसाठी विनाशुल्क परवाने
सर्व मंडळांना एकदम पाच वर्षांसाठी विनाशुल्क परवाने देण्यात येतील, अशी घोषणा पालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी केली.
मेट्रोची बैठक घेणार
गणेशमंडळांनी केलेल्या सूचनानुसार, गणेशोत्सवाच्या काळात मेट्रोच्या कामामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी अथवा मिरवणुकीस अडथळा ठरणाऱ्या ठिकाणी तातडीने योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. तसेच याबाबत लवकरच महामेट्रोच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचेही ते म्हणाले.